पुणे जिल्ह्यातील विविध 18 प्रकारच्या पारंपरिक बलुतेदार कारागिरांना त्यांच्या व्यवसायासाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज दिले जाणार आहे. हे कर्ज दर साल दर शेकडा ( द.सा. द.से.) केवळ पाच टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. या कर्जाचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

केंद्र सरकारने पारंपरिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत हे कर्ज वाटप करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

या योजनेंतर्गत कर्जाचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील 18 पारंपरिक बलुतेदार कारागिरांना सूक्ष्म , लघु व मध्यम उद्योग विभागाचे संकेतस्थळ, सामान्य सुविधा केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्रात नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

या कारागिरांचा योजनेत समावेश..

सुतार, होड्या बनवणारे, हत्यारे बनवणारे, लोहार, टाळे बनवणारे, हातोडा आणि टूलकीट बनविणारे, सोनार, कुंभार, मूर्तिकार, चर्मकार, बांधकाम करणारे, चटई आणि झाडू बनवणारे, पारंपरिक बाहुल्या आणि खेळणी बनविणारे, न्हावी, हार बनविणारे, धोबी, शिंपी, माशाचे जाळे आदी कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ऑनलाइन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

– आधार कार्ड

– पॅन कार्ड

– जन्म तारखेचा पुरावा किंवा हस्तांतरण प्रमाणपत्र

– जातीचे प्रमाणपत्र

– शिधापत्रिका

– पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

– बँकेचे पासबुक

– आधारकार्ड संलग्न असलेला मोबाईल नंबर

अशी करा नोंदणी..

ग्रामीण भागातील सुविधा केंद्रावर (सीएससी) आपली माहिती भरून नोंदणी करावी.

ही माहिती गावाचे सरपंच तपासून योग्य असलेल्या उमेदवारांची माहिती व अर्ज जिल्हा समितीकडे पाठवणार..

जिल्हास्तरीय समिती या यादीतील कारागिरांना प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल. तसेच या योजनेंतर्गत कर्जाचा लाभ घेण्यासाठी निवड झालेल्या कारागिरांना 5 दिवसीय मूलभूत प्रशिक्षण व 15 दिवसीय कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या प्रशिक्षण कालावधीत प्रत्येकी प्रतिदिन 500 रुपये विद्यावेतन दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर पंतप्रधान विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *