इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी लवकरच रस्त्यावरच नव्हे तर समुद्रावरही धावताना दिसणार आहेत. डिसेंबरपासून मुंबईसह MMR च्या सात ठिकाणी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध होणार आहे. इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसने चार इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सीसह सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
चारपैकी 2 बोटी 24 शिटरच्या तर 2 बोटी 12 शिटरच्या आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, मुंबईसह एलिफंटा, नेरुळ, कारंजा , रेवस, वाशी, जेएनपीटी बंदर, ऐरोली येथील बेलापूर येथून टॅक्सी चालवण्याची परवानगी मिळाली आहे.
इलेक्ट्रिक टॅक्सी चालवल्याने केवळ समुद्रातील प्रदूषण कमी होणार नाही तर ऑपरेटरचे पैसेही वाचतील. टॅक्सी ऑपरेटर सोहेल कजानी यांच्या म्हणण्यानुसार, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर इलेक्ट्रिक टॅक्सी सलग चार तास धावू शकते. तर डिझेलवर चालणारी वॉटर टॅक्सी एका तासात सुमारे 140 लिटर डिझेल वापरते..
गोवा आणि कोची येथे ट्रायल सुरु..
ऑपरेटिंग खर्च वाचवण्यासाठी कंपनीला प्रत्येक इलेक्ट्रिक टॅक्सीवर सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करावे लागले. सध्या गोव्यात 24 सीटर टॅक्सीची ट्रायल सुरू आहे आणि कोचीमध्ये 6 सीटर टॅक्सीची ट्रायल सुरू आहे. टॅक्सी 12 नॉटिकल मैल वेगाने धावण्यास सक्षम आहे. या बोटीने मुंबई ते नवी मुंबई सुमारे तासाभरात प्रवास करता येतो. पुढील महिन्यात ट्रायल रन पूर्ण करून ही टॅक्सी मुंबईत पोहचणार आहे. सध्या बेलापूर ते एलिफंटा, मांडवा आणि अलिबाग दरम्यान वॉटर टॅक्सी सुरू आहे..
हा होणार फायदा..
इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी आल्याने कंपनी पुन्हा एकदा मुंबई ते बेलापूर मार्गावर सेवा सुरू करेल अशी अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते, या मार्गावर धावणाऱ्या पूर्वीच्या बोटींच्या तुलनेत इलेक्ट्रिक बोट लहान असते. यामुळे बोटीचा काही भागच पाण्याखाली असेल. त्यामुळे मुंबई – बेलापूर मार्गावर टॅक्सी खडकावर आदळण्याची शक्यता फारच कमी आहे. टॅक्सी खडकावर आदळल्याने चालकांनी गेल्या काही महिन्यांपासून मुंबई – बेलापूर मार्गावर टॅक्सी चालवणे बंद केले आहे.
इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, गेटवे ऑफ इंडियावरून टॅक्सी चालवण्यास परवानगी दिली जाईल. तर त्यांना आधीच देशांतर्गत क्रूझ टर्मिनलवरून ऑपरेट करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवाशांना इलेक्ट्रिक टॅक्सीतून प्रवास करता येणार आहे..
सागरी जीवनासाठी फायदा..
मुंबईजवळील किनारपट्टीवर दररोज शेकडो लहान – मोठ्या जहाजांची ये – जा असते. डिझेलवर चालणाऱ्या जहाजांमुळे समुद्रातील वाढते प्रदूषण हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. याला सामोरे जाण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट इलेक्ट्रिक बोटींना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजनांवर काम करत आहे.
बीपीटीचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्या मते, जहाजांना पर्यायी इंधन पुरवल्यास जहाजांची किंमत 40 ते 50 टक्क्यांनी कमी होऊ शकते. खर्च कमी झाल्याचा फायदा थेट प्रवाशांना होणार आहे, परिणामी प्रवासी भाडेही कमी करणे शक्य होणार आहे. जगातील अनेक देशांमध्ये जहाजे डिझेलऐवजी पर्यायी इंधनावर चालवली जातात. यामुळे अत्यल्प दरात सेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच समुद्रातील प्रदूषणातही घट होणार आहे.