सोलापूर जिल्हा माढा तालुक्यातील परिते येथील गणेश भिवाजी बाबर या युवा शेतकऱ्याने प्रति एकरी 109 टन ऊस उत्पादन घेतले असून, त्यांना 92 गुंठ्यात 251 टन ऊस उत्पादन मिळाले आहे.
गणेश बाबर यांनी आपल्या 92 गुंठे जमिनीत नांगरट, मेहनत मशागत करून शेणखत मिसळून, फणपाळीनंतर दोन सऱ्यांमध्ये पाच फुटाचे अंतर ठेवून उसाला सरी सोडली व यामध्ये 21 जून 2022 रोजी को 86032 या ऊस वाणाची, सव्वा फूट अंतरावर एक डोळा या पद्धतीने बीज प्रक्रिया करून उसाची लागण केली. संजीवनी चार्टप्रमाणे खताच्या मात्रा दिल्या.
विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी नारायण लगड, बेंबळेचे ऊस भूषण सोमनाथ हुलगे यांच्या वेळोवेळीच्या मार्गदर्शनानुसार तणनाशक, कीटकनाशक व बुरशी नाशकाच्या फवारण्या केल्या.
तर शेवटची फवारणी ड्रोनच्या साह्याने केली. ठिबकद्वारे पाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले. त्यामुळे उसाची कांडी मोठी, कसदार, लांब अशी तयार झाली. तर उसाचे पाचट रुंद तयार झाले. त्यांच्या उसाच्या एका बुडास जवळपास 22 उसाचे फुटवे होऊन 50 काड्यांचा ऊस निघाला आहे.
हा अडसाली लागणीचा ऊस नुकताच विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याकडे गळितासाठी वेळेवर नेण्यात आला. त्यावेळेस या 92 गुंठ्यात बाबर यांना 251 टन ऊस उत्पादन मिळाले. म्हणजेच प्रति एकरी त्यांनी सरासरी 92 टनाचे उत्पादन घेतले आहे. संपूर्ण उत्पादन घेण्यासाठी बाबर यांना 80 ते 85 हजार रुपये खर्च झाला व त्यांना नऊ लाख रुपयेपर्यंत निश्चित उत्पन्न मिळणार आहे.