शेतीशिवार टीम : 24 सप्टेंबर 2022 :- बदलते हवामान, वाढती मजूरी, कोरोना रोगामुळे पडलेलं लॉकडाऊन, नेहमी पडणारे पिकांचे बाजार भाव यामुळे शेतकरी बांधवांना शेती करणे जिकीरीचे झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांची मुले शेती करण्यास धजावत नाहीत. हे चित्र नेहमी पहावयास मिळत आहे. या सर्वांवर मात करणारे चित्र हंगेवाडी (ता.श्रीगोंदा) परिसरात पाहण्यास मिळत आहे.
कोरोना रोगामुळे देशासह जगात लॉकडाऊनमुळे अनेक तरुणांना आपला रोजगार गमवावा लागला. त्यामुळे बेरोजगार होऊन अनेकांनी शहराचा रस्ता सोडून गावाकडील शेतीचा रस्ता धरला आहे.
यातच शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना, श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील 32 वर्षीय अल्पशिक्षित तरुणाने आपल्या कुटुंबाच्या मदतीने शेतीमध्ये योग्य नियोजन केलं अन् अवघ्या दीड एकर क्षेत्रात डाळिंबाची लागवड करून, केवळ 7 महिन्याच्या कालावधीत 30 टन डाळिंबाचे विक्रमी बाजार भावानुसार 18 लाख रुपये कमावले आहे. नवनाथ दिगंबर विधाते असे या तरुणाचे नाव असून परिसरात त्याच्या शेतीमधील यशोगाथा मुळे तो चर्चेत आला आहे.
नवनाथ दिगंबर विधाते हे एकत्र कुटुंब पद्धतीत आपल्या आई वडील आणि भावासोबत राहतात. विधाते कुटुंबाला हंगेवाडी येथे सुमारे 8 एकर क्षेत्रापैकी घराजवळ असलेल्या दीड एकर क्षेत्रावर 6 वर्षापूर्वी 700 डाळिंबाच्या झाडांची लागवड केली होती तर 1 वर्षांपूर्वी दीड एकरावर डाळिंबाची लागवड केली आणि उर्वरित पाच एकरावर ऊस कांदा आणि भाजी पाल्याचे उत्पन्न घेत असतात.
चालू वर्षी जुनी लागवड असलेल्या दीड एकरावरील डाळिंबाच्या एक झाडाला सरासरी 40 ते 45 किलो डाळिंबाचे उत्पन्न निघत असून एकूण 700 झाडांवर 30 टन डाळिंबाचे विक्रमी उत्पन्न निघालं असून या डाळिंबाला पश्चिमबंगाल मधील कोलकत्ता येथील व्यापाऱ्याने दिलेल्या 70 ते 100 रू. प्रती किलो बाजार भावामुळे 18 लाख रुपये कमावले आहे.
या डाळिंबाला औषध, शेणखत, सोलेबल तसेच मजुरीसाठी अवघा 2 लाख रुपये खर्च आला. या तरुणाला या कामी वडील दिगंबर विष्णू विधाते, आई मैनाबाई दिगंबर विधाते, तसेच पत्नी माधुरी नवनाथ विधाते आणि मुले यांची मोलाची मदत मिळाली असून नवनाथ दिगंबर विधाते हा तरुण परिसरात त्याच्या शेतीमधील यशोगाथा मुळे तो आख्ख्या तालुक्यात चर्चेत आला असून कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सहकार्यान हे शक्य झाल्याचं विधाते सागतात.
साभार – पुण्यनगरी