पुण्यातील उच्चशिक्षित तरुणाच्या सेंद्रिय शेतीची कमाल! 60 गुंठ्यांत घेतले तब्बल 152 टन उसाचे उत्पादन, पहा कस केलं नियोजन..
जुन्नर तालुक्यातील आळे, लवणवाडी येथील उच्चशिक्षित तरुणाने 60 गुंठ्यांत 152 टन उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांना यामधून चांगल्या प्रकारे नफा मिळाला आहे. सुरेश कुऱ्हाडे हे उच्चशिक्षित असून, आळे येथील महाविद्यालयात उपप्राचार्य म्हणून काम करत असताना शेतीची आवड असल्याने नोकरी करत शेती देखील चांगल्या पद्धतीने ते करत आहेत..
नुकतीच त्यांच्या शेतावर असलेल्या उसाची तोडणी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याने केली असून, एका उसाचे वजन साधारणपणे 3.3 ते 3.50 किलो आहे. एका उसाला 50 ते 55 कांडी आहेत. एका उसाचे चार तुकडे करावे लागतात. कुऱ्हाडे यांनी गेल्या वर्षी जून-जुलै 2024 मध्ये 86032 वाणाच्या उसाची साडेचार फुटाच्या सरीत ठोकर पद्धतीने लागवड केली होती. पाट पाण्याने उसाला नियमितपणे भुकेवर पाणी दिले.
उसाची सरी फोडताना मोकळ्या गोठ्यातील एकरी चार ट्रॉली शेणखत, दोनवेळा रासायनिक व जैविक खतांचा डोस दिला. तसेच सरी फोडण्याच्याअगोदर एक बैलाच्या औताच्या साहाय्याने तीन वेळा उसाला मातीची भर लावली. सदर उसाला ड्रोनद्वारे मार्च आणि ऑगस्ट महिन्यात दोनवेळा जैविक औषधे वापरून फवारणी केल्यामुळे उसाचे वजन व वाढ चांगली झाली.
ऊस लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्यांना 1 लाख 60 हजार रुपये खर्च आला असून, संपूर्ण खर्च वजा जात त्यांना 3 लाख 24 हजार 800 रुपयांच नफा मिळाला आहे.
शेतीत आधुनिक पद्धतीने, तसेच जैविक खतांचा वापर केल्यास पीक चांगले येते व लागवडीपासून नियोजन तसेच आधुनिकतेची जोड दिल्यास ऊस शेतीत हमखास शाश्वत उत्पादन मिळते. माझे आजोबा कै. भाऊ ऊर्फ रखमा सखाराम कुऱ्हाडे यांनी शेतीतील सर्व कामे करण्याचे मला लहानपणापासून शिकवले होते. त्यामुळे शेतीची मला आवड असल्याने कमी क्षेत्रात उसाचे विक्रमी उत्पादन दरवर्षी घेत आहोत.
सुरेश कुऱ्हाडे, ऊस उत्पादक शेतकरी
60 गुंठ्यांतील ऊस शेतीसाठी आलेला खर्च..
113200 – ऊस बियाणे
40000 – मशागत
8000 – लागवड
10000 – खुरपणी
12000 – सरी फोडणे
68800 – औषधे व शेणखत सेंद्रिय खते
10000 – इतर खर्च
1,60,000 – एकूण खर्च (सरासरी)
रासायनिक खतांना फाटा
कुऱ्हाडे यांनी विशेष करून रासायनिक खतांना फाटा देत फक्त शेणखत व गूळ, गोमूत्र, वारूळाची माती, शेण, ताक यापासून स्लरी तयार करून वाफ्यात पाणी भरताना सोडल्याचा त्यांना फायदा झाला.
सेंद्रिय खतांचा वापर
एकरी चार ट्रॉली शेणखत
दोन वेळा रासायनिक व जैविक खतांचा डोस
घरगुती पद्धतीने बलविलेली स्लरी
ड्रोनद्वारे जैविक औषध फवारणी
60 गुंठ्यात मिळालेले उत्पादन व उत्पन्न
उसाचे वाण – 86032
उसाचे वजन- 3 ते 3.50 किलो
उसाला एकूण कांड्या – 50 ते 55
उत्पादन – 152 टन
उत्पन्न (सरासरी) – 4 लाख 86 हजार 400 रुपये
एकूण नफा – 3 लाख 24 हजार 800 रुपये