कोरोनामुळे राज्यात रखडलेल्या जमिनींच्या मोजण्या वेगाने करण्यासाठी भूकरमापकांची भरती करण्यात आली असताना भूमी अभिलेख विभागाला ६०० अत्याधुनिक रोव्हर यंत्रे खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ही यंत्रे खरेदी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ६० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला आहे.

त्यामुळे राज्यातील प्रलंबित जमिनींच्या लाखो मोजण्या मार्गी लागणार आहेत. या यंत्रांचे जिल्हानिहाय भौगोलिक परिस्थिती, क्षेत्रफळ आणि प्रलंबित जमीन मोजण्या यानुसार वाटप करण्यात येणार आहे. भूमी अभिलेख विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव आणि कोरोनामुळे जमीन मोजणीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित होती. त्यातच भूमी अभिलेख विभागाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून वेगाने आणि अचूक जमीन मोजणीसाठी मोठ्या प्रमाणात रोव्हर यंत्रांसाठी निविदा काढली होती.

दीर्घ कालावधीनंतर भूमी अभिलेख विभागाला चालू वर्षी मार्च महिन्यात ३०० रोव्हर यंत्रे प्राप्त झाली आहेत. त्यानंतर आता ६०० रोव्हर यंत्रे खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. मार्च अखेरपर्यंत राज्यातील २ लाख ३५ हजार ९८९ जमीन मोजण्या निकाली काढण्यात आल्या आहेत.

१ लाख ७ हजार ३१४ मोजण्या अद्यापही प्रलंबित असून १ एप्रिलपासून त्यामध्ये ६० हजार नव्या मोजण्यांची भर पडली आहे. नव्याने ६०० रोव्हर खरेदीसाठी परवानगी मिळाली आहे. त्याकरता आवश्यक निधीदेखील लवकरच प्राप्त होईल. त्यामुळे जमिनींच्या मोजण्या लवकर निकाली काढण्याचा अंदाज भूमी अभिलेख विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

जमीन मोजणीसाठी सहा महिने, तातडीच्या मोजणीसाठी एक महिना, तर अति – अति तातडीच्या मोजणीसाठी १५ दिवसांचा कालावधी लागत होता. आता हा कालावधी कमी होऊन सहा महिन्यांऐवजी अवघ्या दोन ते अडीच महिन्यांवर येणार आहे.

अतितातडीच्या मोजण्या तत्काळ करण्यात येत आहेत. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने राज्यात ७७ ठिकाणी कॉर्स कण्टिन्यूस ऑपरेशन रेफरन्स स्टेशन) उभारली आहेत.

या कॉर्सच्या आधारे जीपीएस रीडिंग फक्त ३० सेकंदांत घेता येणार आहे. कॉर्सचे रीडिंग रोव्हर रिसिव्ह घेत असून हे रीडिंग टॅबमध्ये दिसते. राज्यात भूमी अभिलेख विभागाची ३५५ कार्यालये असून भौगोलिक परिस्थिती आणि रखडलेल्या मोजणी अर्जानुसार कार्यालयांमध्ये रोव्हर यंत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती भूमी अभिलेखाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *