कारमध्ये ठेवलेली पाण्याची बॉटल ठरली मृत्यूचं कारण ; अपघातात इंजिनियरचा दुर्दैवी मृत्यू, तर मित्र गंभीर…
शेतीशिवार टीम, 6 डिसेंबर 2021 : एखादी छोटीशी चूकही कधी – कधी माणसाच्या जीवावर बेतू शकते. याचं ताज उदाहरण म्हणजे एका इंजिनियरने कारमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे जीव गेला आहे. तर मित्र गंभीर जखमी झाला आहे.
दिल्लीमध्ये राहणारा इंजिनिअर अभिषेक झा एका मित्रासोबत कारने ग्रेटर नोएडाकडे जात असताना एक्स्प्रेस वेवर कारचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली, आणि या भीषण अपघातात त्याला आपला जीव गमवावा लागला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. कारमध्ये असलेल्या पाण्याच्या बाटलीमुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक कार चालवत असताना सीटच्या मागे ठेवलेली पाण्याची बाटली घसरली आणि अभिषेकच्या पायाजवळ आली. ट्रक जवळ आल्याचे पाहून अभिषेकने कारवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रेक दाबला. मात्र ब्रेक पॅडलखाली बाटली असल्याने ब्रेक लावता आला नाही आणि कारचा ताबा सुटला अन् थेट ट्रकला जोरदार धडकली.
पोलिसांनी सांगितले की, सेक्टर 144 जवळ हा अपघात झाला ज्यात वाहन चालवणाऱ्या अभिषेकचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक झा हे ग्रेटर नोएडा येथील एका कंपनीत इंजिनिअर होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेक त्याच्या मित्रासोबत शुक्रवारी रात्री रेनो ट्रायबरच्या गाडीने नोएडाहून ग्रेटर नोएडाला निघाला होता. दरम्यान, सेक्टर 144 जवळ त्यांची भरधाव कार खराब झालेल्या ट्रकला धडकली. रिपोर्टनुसार, ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली आल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आलं.