शेतीशिवार टीम : 6 ऑगस्ट 2022 :- माणसाला घेऊन उडणारा भारतातील पहिला ड्रोन तयार झाला आहे . भारतीय नौदलासाठी देशातील पहिले पॅसेंजर ड्रोन महाराष्ट्रात तयार करण्यात आला आहे . ‘वरुण’ असे या ड्रोनचे नाव आहे. हा 130 किलो वजनासह उड्डाण करू शकतो, जो 25 ते 33 मिनिटांत 25 Km चा प्रवास पूर्ण करेल.
नौदलाचे अधिकारी ‘वरुण’द्वारे उड्डाण करणार आहे. पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीमधील सागर डिफेन्स इंजिनीअरिंग कंपनीने हा ड्रोन तयार केला आहे.
‘वरुण’ ड्रोन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत सक्षम आहे. या ड्रोनमुळे एका ठिकाणावरील वस्तू, माणूस दुसऱ्या ठिकाणी कमी वेळात आणि कमी खर्चात सहज घेऊन जाता येणार आहे. ड्रोन पूर्णपणे स्वयंचलित आहे. म्हणजेच नौदलाच्या अधिकाऱ्यांना फक्त त्यात बसावे लागेल, ड्रोनच त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाईल.
वरुणच्या सागरी चाचण्या येत्या 3 महिन्यांत सुरू होणार आहेत. कंपनीच्या इंजिनीअर्सनी चार वर्षांच्या अथक मेहनतीतून हा ड्रोन तयार केला आहे. खास भारतीय सैन्य दलाच्या मदतीसाठी हा ड्रोन तयार केला आहे. एका ठिकाणावरील अवजड सामान या ड्रोनच्या साहाय्याने दुसऱ्या ठिकाणी ठेवता येईल.
रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी देखील या ड्रोनची मदत होऊ शकते. नौदलाने सागर डिफेन्सला हा प्रकल्प दिला होता. सुमारे दीड वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याची योजना असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ते नौदलाच्या अनेक गरजा पूर्ण करू शकेल, असेही सांगण्यात आले आहे.
सुरक्षित लँडिंगसाठी ड्रोनमध्ये पॅराशूट :-
हवेत तांत्रिक बिघाड झाल्यानंतरही ड्रोन सुरक्षित लैंडिंग करण्यास सक्षम आहे. यात पॅराशूट देखील आहे, जे आपत्कालीन किंवा खराबीदरम्यान आपोआप उघडेल आणि ड्रोन सुरक्षितपणे उतरेल. यासोबतच वरुणचा वापर एअर ॲम्ब्युलन्ससाठी आणि दूरच्या भागात सामान पोहोचवण्यासाठी करता येईल, असे कंपनीचे सह- संस्थापकांनी सांगितले.