शेतीशिवार टीम, 30 डिसेंबर 2021 : राज्याची राजधानी मुंबईत कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. आज गुरुवारी शहरात कोरोना व्हायरसचे 3671 नवे रुग्ण आढळले आहे. तर गेल्या 24 तासांत शहरात 371 जण कोरोना मुक्त झाले आहे. नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने शहरातील अँक्टिव्ह रुग्णांची संख्या 11360 वर पोहोचली आहे.
तसेच मुंबईतील धारावीमध्येही 18 मे नंतर सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारावीमध्ये गुरुवारी कोरोनाचे 20 रुग्ण आढळून आले आहेत.
बुधवारच्या तुलनेत केवळ एका दिवसात शहरात कोरोना विषाणूच्या 1000 हून अधिक नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. बुधवारी मुंबईत कोविड-19 चे 2,510 रुग्ण आढळले, जे 8 मे नंतरचे सर्वाधिक होते.
तर संपूर्ण राज्यात आज कोरोनाच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय बनली आहे. आज राज्यात कोरोनाचे 5 हजार 368 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधिक एकट्या मुंबईत 3671 नवे रुग्ण, ठाण्यात 864 आणि पुण्यात 520 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
राज्यात ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटचे तब्बल 198 नवे रुग्ण :-
राज्यात ओमिक्रॉन (Omicron) व्हेरियंटचाही स्फोट झाला असून आज तब्बल 198 नवे रुग्ण आढळले आहे. एकट्या मुंबईत तर ओमिक्रॉनने कहरचं केला आहे तब्बल 190 नवे रुग्ण आढळले असून ठाण्यात 4 रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 450 रुग्णांची नोंद झाली आहे तर 125 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.
राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने वाढल्याने ठाकरे सरकारने प्रशासनाला अलर्ट केले आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्सची बैठक पार पडली आहे. त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी मुंबईतले नियम आणखी कडक करण्यात आले आहेत, एकट्या मुंबईतच नाही तर अनेक राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर शहरातही नियम आणखी कडक करण्यात आले असून काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.