मध्य रेल्वेने आपल्या क्षेत्रीय सीमा असलेल्या प्रत्येक भागात रेल्वे वाहतूक सुविधा प्रदान करण्याच्या सततच्या प्रयत्नात संपूर्ण महाराष्ट्रात अनेक पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली आहेत. या प्रकल्पांमध्ये नवीन रेल्वे लाईन टाकणे, रेल्वे रुळांचे दुहेरीकरण आणि नवीन स्थानके बांधणे यांचाही समावेश आहे.
वर्धा – नांदेड नवीन रेल्वे मार्ग हा सर्वोच्च प्राधान्याने राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. वर्धा – नांदेड नवीन रेल्वे मार्ग सर्वात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांपैकी एक असून हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग 284.65 किलोमीटर लांबीचा आहे.
त्यापैकी फक्त वर्धा ते कळंबपर्यंतचा 38.61 किलोमीटरचा भाग पूर्ण झाला आहे. यवतमाळ ते दिग्रस या पुढील विभागात 77.30 अंतरावर काम वेगाने सुरू आहे आणि 2024-25 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
कळंब – यवतमाळ (38.96 किमी) आणि दिग्रस – नांदेड (129.78 किमी) हे उर्वरित विभाग 2025-26 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या मार्गावर 26 स्थानके आहेत.
28 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 38.61 किमीच्या वर्धा – कळंब नवीन मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन मार्गावरील रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
यातील वर्धा – यवतमाळ – नांदेड नवीन ब्रॉडगेज मार्गिका प्रकल्प मध्य रेल्वे आणि रेल विकास निगम लिमिटेड यांनी संयुक्तपणे बांधला आहे. वर्धा – कळंब दरम्यानची 38.61 किमी लांबीची रेल्वे वर्धा, देवळी भिडी आणि कळंब यांना सुलभ वाहतूक सुविधा प्रदान करेल. या मार्गावरील रेल्वे सेवा या आणि आसपासच्या भागातील विद्यार्थी, व्यापारी आणि रहिवाशांसाठी सुलभ प्रवास सुनिश्चित करतील.
वर्धा – कळंब मार्गावर प्रवास सुरु..
असा बांधला जाणार वर्धा – यवतमाळ मार्ग..
वर्धा – देवळी : टप्पा – 1 मध्ये 14.92 किमी कार्यान्वित आहे.
देवळी – कळंब : टप्पा- 2 मध्ये 25.69 किमी कार्यान्वित आहे.
कळंब – यवतमाळ : 38.96 किमी अंतिम टप्यात कार्यान्वित होणार.
आर्थिक आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था या प्रकल्पामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे या क्षेत्राच्या सामाजिक – आर्थिक विकासाला चालना मिळेल. हा प्रकल्प या प्रदेशातील दळणवळण आणि वाहतुकीचे पर्याय वाढवण्यासाठी सज्ज आहे, ज्यामुळे प्रवासी आणि अर्थव्यवस्था दोघांनाही फायदा होण्यास मदत होईल.