शेतीशिवार टीम : 27 जुलै 2022 :- शेतकऱ्यांच्या सावकारी कर्जमाफी संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज 27 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. आणि या शासन निर्णय बद्दलची सविस्तर अशी माहिती आपण आज शेतीशिवारच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्य शासनाने 10 एप्रिल 2015 मध्ये एक शासन निर्णय घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून सावकारी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याची सावकारी कर्ज माफ करण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला होता. त्यामध्ये मराठवाड्यातील आणि विदर्भातील 14 जिल्ह्यातील सावकाराकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेलं होतं.
परंतु, शासन निर्णयाच्या माध्यमातून एक अट घालण्यात आली होती की, सावकाराने सावकारी परवानामध्ये नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज योजने अंतर्गत अपात्र ठरवण्यात आलं होतं.
परंतु यावर घेण्यात आलेले आक्षेपात बरेच असे शेतकरी वगळले जात होते. आणि या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून 13 सप्टेंबर 2019 रोजी या शासन निर्णयाच्या संदर्भातील शुद्धी – पत्रक काढून सावकारी परवण्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेली कर्जसुद्धा माफ करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.
यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील 14 जिल्ह्यातील जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून पात्र ठरविण्यात आलेल्या 3 हजार 749 शेतकऱ्यांसाठी 9.4 कोटी रुपयांच्या कर्जमाफीसाठी शिफारस करण्यात आलेली होती.
या शिफारसीनुसार, 2022 -23 करता 9 कोटी 4 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती. आणि आज 27 जुलै 2022 रोजी हा शासन निर्णय घेऊन विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी सन 2022 आर्थिक वर्षातील मंजूर तरतुद मधून 3 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे मराठवाडा आणि विदर्भातील 14 जिल्ह्यातील 3749 पात्र कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे.