राज्यात पाऊस सक्रिय असून गुरुवारी मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भातील काही भागांत पाऊस पडला. पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात पूर्वमोसमी पावसाला अनुकूल वातावरण आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्र आणि त्यालगतच्या बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात रविवार, 19 मेदरम्यान दाखल होण्याची शक्यता आहे.
दक्षिण कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत वातावरणातील खालच्या थरातील वारे विरळ झाले आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत पुणे येथे 3.4 मि.मी., लोहगाव 2, कोल्हापूर 2 महाबळेश्वर 6, सांगली 7, सातारा 3 तर चंद्रपूर येथे 4 मिमी पाऊस पडला आहे. तसेच इतर भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.
या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज..
राज्यात सांगली, सोलापूर, अहमदनगरसह कोल्हापूर, जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे..
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास) यासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शुक्रवार, 17 ते शनिवार, 18 मे दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस, सोसाट्याचा वारा वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून 19 मे (रविवार) पर्यंत अंदमानात दाखल होणार..
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनची वाटचाल वेळेपूर्वी सुरु आहे. नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार आहे. मान्सूनची वाटचाल अशीच राहिली, तर यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
मान्सून 19 मे (रविवार) पर्यंत अंदमानात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे यंदा मान्सून वेळेवर येणार असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
केरळमध्ये यंदा 31 मेपर्यंत मान्सून पोहोचणार आहे, अशी माहिती माजी हवामानतज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपि यांनी दिली.
अवकाळी पावसाचा जोर कमी होत असतानाच मान्सून सुरू होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी नांगरट, पाळी घालून पेरणीयोग्य तयारी करावी. मात्र, 100 मिमी पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये. अवकाळी वा वळवाच्या पावसाच्या जोरावर पेरणी करण्याचे धाडस शेतकऱ्यांनी करू नये. असे त्यांनी सांगितले.