राज्यातील सावकारी संपवण्यासाठी सरकारकडून कितीही प्रयत्न केले जात असले तरी राज्यात आजही अनेक शेतकरी खासगी सावकारांकडून कर्ज घेतात. ही वस्तुस्थिती आहे. गावातील बँकांकडून पीक कर्जवाटपासाठीचे आवश्यक निकष आणि या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे शेतकरी गावातील किंवा ओळखीतील सावकाराकडून कर्ज घेण्याला प्राधान्य देताना दिसून येतात.
मात्र, बऱ्याचदा कर्जाची परतफेड वेळेवर न केल्यामुळे सावकार संबंधित शेतकन्याच्या जमिनीवरच ताबा घेतो. अशावेळी कर्जापायी नडलेल्या शेतकऱ्यांची बिकट अवस्था होते. मात्र, परवानाधारक सावकारांकडून ठरवून दिलेल्या व्याजदरानुसार कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांची अशाप्रकारे फसवणूक होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
आतापर्यंत 27 कोटींचे कर्जवाटप..
पुणे जिल्ह्यात या वर्षी आतापर्यंत या खासगी सावकारांकडून 27 कोटी 28 लाख 76 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याचे समोर आले आहे.
दोन तालुक्यांत कर्ज जास्त
पुणे जिल्ह्यातील इंदापूर व खेड या दोन तालुक्यांत बिगरशेती कर्जाचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. इंदापूर व पुरंदर या दोन तालुक्यात शेती मोठ्या प्रमाणावर करत असल्याने या दोन तालुक्यांत शेती कर्ज व बिगर शेती कर्जाचे प्रमाण देखील अधिक आहे. अशी माहिती समोर आली आहे.
जिल्ह्यात परवानाधारक सावकारांची संख्या 352
पुणे जिल्ह्यात एकूण 352 परवानाधारक सावकार आहेत. सावकाराने कर्जदारांकडून आकारण्यात येणाऱ्या व्याजाचे कमाल दर राज्य सरकारने निश्चित केलेले आहेत. त्यानुसार, सावकार जर शेतकऱ्याला कर्ज देत असेल तर तारण कर्जाला प्रतिवर्ष 9% आणि विनातारण कर्जाला प्रतिवर्ष 12% व्याजदर निश्चित करण्यात आला.
शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींना सावकार कर्ज देत असेल तर तारण कर्जाला 15% आणि विनातारण कर्जाला 18% व्याजदर आकारण्याची मुभा सरकारने या सावकारांना दिली आहे. पुणे जिल्ह्यात कर्ज घेणाऱ्यांची एकूण संख्या 15 हजार 727 इतकी आहे.भोर तालुक्यात एकही कर्जदार नसल्याची माहिती समोर आली आहे. तर यादरम्यान हवेली तालुक्याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
कर्ज घेणाऱ्यांची तालुकानिहाय संख्या व कर्जदारांची संख्या अशी आहे.
आंबेगाव :- 4000
बारामती :- 2079
दौंड :- 190
इंदापूर :- 445
जुन्नर :- 1245
खेड :- 4959
मावळ :- 34
मुळशी :- 182
पुरंदर :- 2340
शिरूर :- 248
वेल्हा :- 5
अश्याप्रकारे एकूण 15727 लोकांनी कर्ज घेतले आहे.