जगातला सर्वात मोठ्या रुंदीचा बोगदा महाराष्ट्रात,13.30Km च्या अंतरासाठी 7,000 कोटींचा खर्च, पुणे-मुंबई प्रवास होणार तासाभराने कमी, पहा रोडमॅप..
देशातीलच नव्हे तर जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गातील मिसिंग लिंक प्रकल्प हा देशातील नवी दिशा दाखवणारा प्रकल्प ठरणार असून लाखो प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. हा प्रकल्प जानेवारी 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
बोगद्याची लांबी किती ?
नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग प्रकल्पाच्या खोपोली ते कुसगाव या भागाला भेट देऊन लोणावळा सिंहगड संस्थेत सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे काम खूप आव्हानात्मक होते. हा बोगदा लोणावळा तलावाच्या तळापासून सुमारे 500 ते 600 फूट अंतरावर असणार आहे. या प्रकल्पातील बोगद्याची लांबी 8 Km असणार आहे. शिवाय हा बोगदा जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधला जात आहे. त्यामुळे याचे महत्व आणखीनच वाढले आहे.
बोगद्याची रुंदी तब्बल 23.75 मीटर आहे आणि हा देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात रुंद बोगदा असणार आहे. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर तासाभराने कमी होणार आहे. बोगद्याच्या कामामुळे घाट परिसरातील प्रवास पूर्णपणे टळेल आणि अपघातांचे प्रमाण देखील बऱ्यापैकी कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
हाय प्रेशर वॉटर मिक्स सिस्टीमचा केला आहे उपयोग
या प्रकल्पामुळे प्रवाश्यांचा प्रवास सुखकर तर होणार आहेच. सोबत वाहतूक कोंडी देखील कमी होईल. तसेच प्रदूषण कमी होऊन इंधन व वेळेची बचत देखील होईल. रॉक स्लायडिंग होऊ नयेत यासाठी ठिकठिकाणी रॉक बोल्ट तयार करण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पाडण्यासाठी प्रत्येक 300 मीटरवर बाहेर पडण्याचे मार्ग तयार करण्यात आले आहेत. बोगद्याच्या भिंतीला ५ मीटरची कोटिंग असणार असून त्यावर अग्निरोधक कोटिंग देखील लावण्यात येणार आहे. त्यामुळे आग लागल्यास ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित होऊन आग विझवते.
समृद्धी महामार्गावर होणार राज्यातला दुसरा मोठा बोगदा..
हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर दुसरा मोठा बोगदा इगतपुरी ते कसारा यांना जोडणारा आहे. हा बोगदा 18 मीटर रुंदीचा तर 7.78 किलोमीटर लांबीचा असून समृद्धी महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा आहे.
मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेची मिसिंग लिंक – माहिती आणि स्थिती अपडेट..
MSRDC द्वारे मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचा 13.3 Km चा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प खोपोली ते कुसगावला जोडणारा मार्ग संरेखन असलेला 8 लेन प्रवेश – नियंत्रित महामार्ग आहे.
खंडाळा घाटाच्या भूस्खलन प्रवण वळणांना बायपास करणे, हे याचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. त्याचबरोबर अंतर कमी करणे, प्रवासाचा वेळ 25 मिनिटांनी कमी करणे आणि एक सरळ मार्ग प्रदान करणे हे या व्हायाडक्ट, बोगदे आणि पुलांच्या स्ट्रिंग जोडण्याऱ्या मिसिंग लिंकचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या प्रकल्पाला 13 जून 2017 रोजी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने बांधकामासाठी मंजुरी दिली होती. हा प्रकल्प सध्याच्या मुदतीनंतर जानेवारी 2025 मध्ये पूर्ण होणे आणि वाहतुकीस उघडणे अपेक्षित आहे.
या प्रकल्पामध्ये दोन जुळे बोगदे (1.75 किमी आणि 8.92 किमी), दोन केबल स्टेड ब्रिज (770 मी आणि 645 मी), एक छोटा पूल, कल्व्हर्टयांचा समावेश आहे. 645 मीटर केबल स्टेड ब्रिजमध्ये जमिनीपासून अंदाजे 100 मीटर उंचीवर डेकसह 170 मीटर उंच समांतर खांब असतील.
या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च: रु. 6695.36 कोटी आहे. तर प्रकल्पाची एकूण लांबी : 13.30 किमी असणार आहे. 8 लेन, राइट ऑफ वे 100 मी आहे, तर बोगद्याची रुंदी: 23.50 मी असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.
कामाची वर्तमान स्थिती
बोगद्याचे काम नियंत्रित ब्लास्टिंग पद्धतीने केले जात आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये RHS बोगद्यासाठी पहिला आणि फेब्रुवारी 2022 मध्ये LHS बोगद्यासाठी पहिला टनल ब्रेकथ्रू नोंदवला होता.
निविदा आणि कंत्राटदार
या प्रकल्पाचे कंत्राट फेब्रुवारी-मार्च 2019 मध्ये 36 महिन्यांच्या पूर्ण कालावधीसह देण्यात आले.