Aurangabad Neo Metro : 28 Km अंतरासाठी 6,278 कोटींचा निधी; शेंद्रा ते वाळूज ‘हे’ असणार 22 स्टेशन्स, मनपाकडून आराखडा सादर..
औरंगाबाद शहरात नियो मेट्रो रेल्वे आणि शेंद्रा ते वाळूज अखंड उड्डाण पूल यासाठी तीन महिन्यांपूर्वी 31 ऑक्टोबर रोजी महा मेट्रोकडून पहिले प्रेझेंटेशन देण्यात आले. या बैठकीत काही बदल करण्याच्या सूचना महा मेट्रोला देण्यात आल्या होत्या. त्यासाठी मनपा, पोलिस, पुरातत्व विभाग, छावणी यासह सबंधित विभागशीही चर्चा झाली. याच धर्तीवर शुक्रवारी ( दि.6 ) महामेट्रोचे महाव्यवस्थापक विकास नगलूकर यांनी मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीमध्ये लवकरच नियो मेट्रोचा अंतिम आरखडा सदर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वर्षभरापासून शहरात शेंद्रा ते वाळूज अखंड उड्डाण पूल आणि मेट्रो रेल्वेबाबत चर्चा सुरू आहे. या प्रकल्पासाठी 6 हजार 278 कोटी रुपयांचा निधी लागेल, असा प्राथमिक अंदाज महामेट्रोकडून काढण्यात आला होता. पुढील 30 वर्षांत शहराची गरज लक्षात घेऊन हे नियोजन सुरू आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकार निधी उपलब्ध करुन देणार आहे.
अशी असणार नियो मेट्रो :-
ही मेट्रो रेल्वे आणि बस यांचे हायब्रीड व्हर्जन आहे. ती 18 मीटर आणि 24 मीटर या दोन आकारात असते. त्यात 110 ते 170 आसन क्षमतेची असेल. मेट्रो नियोसाठी रुळांची गरज नसून तिला टायर असल्याने ती रस्त्यावरुनच धावते. यासाठी स्वतंत्र एका पिलरवर पूल उभा केला जाणार आहे. पहिल्या टप्यात शेंद्रा ते रेल्वे स्टेशन, हर्सुल ते रेल्वेस्टेशन असा मार्ग ठरवण्यात आला आहे.
पहिल्या टप्यात शेंद्रा ते वाळूज आणि रेल्वेस्टेशन ते मुकुंदवाडी व्हाया हर्सल टी पॉईंट या दोन मार्गांवर नियो मेट्रो प्रस्तावित आहे . या मार्गावर एकूण 22 मेट्रो स्टेशन्स असणार आहेत. शेंद्रा ते वाळूज हा एकूण 28 किमीचा मार्ग प्रस्तावित आहे.
गडकरीच्या बैठकीत अंतिम निर्णय
मनपा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या समोर हा अंतिम डिपीआर सादर झाल्यानंतर या उड्डाण पुलासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या समोरही हा डीपीआर सादर होणार आहे.
असल्याचे डॉ कराड यांनी सांगितले. 1 किलोमीटर उड्डाण पुलासाठी 150 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रोसाठी शहरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्यासमोर सादरीकरण केले जाणार आहे.
काय आहे ही निओ मेट्रो :-
मेट्रो निओ सेवेमध्ये इलेक्ट्रिक बस कोच असतात. एका वेळी 250 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या कोचची लांबी 18 ते 25 मीटर पर्यंत असते. या बसेसमध्ये रबरी टायर असतात आणि त्या रेल्वे किंवा ट्रामसारख्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरने चालतात आणि उंच मार्गावर धावतात.
भारतात 13 मेट्रो रेल्वे प्रणाली आणि सेवा (किंवा जलद संक्रमण प्रणाली) कार्यरत आहेत. ही कोलकाता, दिल्ली, बेंगळुरू (नम्मा), गुरुग्राम (रॅपिड मेट्रो), मुंबई, जयपूर, चेन्नई, कोची, लखनौ, हैदराबाद, नोएडा, अहमदाबाद आणि नागपूर आहेत. आता राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद शहरातही निओ प्रोजेक्ट होणार आहे.
कोलकाता मेट्रो रेल्वे ही देशातील सर्वात जुनी मेट्रो सेवा आहे. 1984 मध्ये स्थापित, कोलकाता मेट्रो सध्या एकूण 33.02 किलोमीटर अंतर कापत आहे आणि 30 स्थानकांवर सेवा देत आहे. 2002 मध्ये सुरू झालेली दिल्ली मेट्रो ही अंतर कव्हर करण्याच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी मेट्रो आहे.
सध्या, दिल्ली मेट्रो 389 Km अंतर व्यापते आणि त्यात 285 स्थानके कार्यरत आहेत (नोएडा-ग्रेटर नोएडा कॉरिडॉर आणि रॅपिड मेट्रो, गुरुग्रामसह, ज्यांचे ऑपरेशन्स सध्या त्यावरून घेतले जातात). बेंगळुरू शहराला सेवा देणारी नम्मा मेट्रो 2011 मध्ये कार्यान्वित झाली. हे 42.3 किमी अंतर व्यापते आणि 40 स्थानके आहेत.
8 मार्च 2019 रोजी उघडलेली नागपूर मेट्रो ही भारतातील सर्वात नवीन मेट्रो प्रणाली आहे. इतर मेट्रो सिस्टीम देखील एका विशिष्ट भागाला कव्हर करत आहेत आणि आगामी काळात आणखी ट्रॅक जोडले जाणार आहे.