भारतातील शेती हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि शेती हा शेतकऱ्यांचा मुख्य उपजीविका आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याची ओळख करून देत आहोत ज्याने केळीच्या शेतीतून आपले संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले..
सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातीळ महाळुंगे गावात राहणारे अमन मुलाणी या युवा शेतकऱ्याची ही यशोगाथा आहे. जे स्वतः कृषी पदवीधर आहेत.
गत दोन वर्षांपासून काही काळ अपवाद वगळता केळीचे दर चांगले टिकून राहिले आहे, त्यामुळे केळी लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल अधिक वाढला आहे.
मुलाणी यांनी डिसेंबर 2022 या ऐन हिवाळ्याच्या महिन्यात आपल्या 2.50 एकर क्षेत्रात केळी लागवडीचा निर्णय घेतला. परंतु केळीच्या रोपांचे दर 16 ते 19 रुपये इतक्या महागड्या दराने असल्याने त्यांना रोपे मिळवण्याकरता खूप मेहनत घ्यावी लागली.
शेवटी त्यांना मुंबई येथील मयंक गांधी यांच्या ग्लोबल विकास ट्रस्ट याच्या संस्थेबाबत समजलं. त्यांनी लगेच ट्रस्टशी संपर्क साधला असता त्यांना 7 रुपये प्रमाणे केळीची रोपे उपलब्ध झाली.
केळीच्या रोपांचे दर 16 ते 19 रुपये एवढे असताना 7 रुपये प्रमाणे मिळालेले रोप ऐन थंडीत लावल्यानंतर शेतकऱ्यांनी उत्पादनाबाबत शंका व्यक्त केल्या. परंतु आज त्यांच्या बागेतील केळी आखाती देशात इराण येथे निर्यात झाली आहे.
मुलाणी यांनी आपल्या कृषी ज्ञानाचा वापर करत केळीची दर्जेदार अशी बाग पिकवली आणि त्या बागेतील केळीची कटाई सध्या चालू आहे. त्यांनी लावलेल्या 3 हजार रोपांमधून कमीत कमी 55 टन केळी निघणे अपेक्षित आहे.
अमन मुलाणी यांच्या बागेतील केळाच्या घडातील प्रत्येक फणीला 24 केळी आहेत. बिगर हंगामी असल्याने घडाचे वजन 25 ते 30 किलो दरम्यान मिळत आहे. केळीची वादी लांब असल्याने ही केळी व्यापाऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. त्यांच्या केळीला 27 रुपये किलो प्रमाणे दर मिळाला असून अकलूज येथील रघुनाथ गायकवाड यांच्या द्वारा बेंगलोर येथील विग्रो प्रायव्हेट लि. ही कंपनी इराण येथे निर्यात करत आहे.
ग्लोबल विकास ट्रस्टचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
ग्लोबल विकास विकास ट्रस्ट ही संस्था मयंक गांधी यांनी संस्थापित केली आहे. केळीसह इतर फळपिकांची रोपे शेतकऱ्यांना या ट्रस्ट मार्फत माफक दरात दिली जातात. रोपे नामांकित कंपन्यांकडून खरेदी करून शेतकऱ्यांना देण्यात येतात. शेतकऱ्यांकडून मिळालेल्या रकमेतील तफावत ही कंपनी स्वतः रोप कंपन्यांना अदा करते, सध्या आमचे कार्य सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात सुरू असल्याचं ग्लोबल विकास ट्रस्टचे प्रतिनिधी प्रवीण संघशेट्टी यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रामध्ये केळी शेतीचे महत्त्व..
महाराष्ट्र हे केळी उत्पादनात आघाडीचे राज्य मानले जाते आणि याचे कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने केळी लागवडीसह इतर फळपिकांना हेक्टरी 75% पर्यंत अनुदान दिले आहे. केळीची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनाही प्रवृत्त केले जात असून यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढत आहेच शिवाय पर्यायी शेतीचा विचार करण्यासही प्रोत्साहन मिळत आहे..