मुंबई – सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड कोकण एक्सप्रेस – वे च्या अंतिम संरेखनाला (Alignment) राज्य सरकारने 6 जुलै रोजी मान्यता दिली होती. त्यानुसार आता संरेखनाचे काम संपुष्टात आलं आहे. आता या एक्सप्रेस – वे बाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून या महामार्गासाठी शंभर मीटर रुंद भूसंपादन करण्याबाबत मान्यता दिली आहे.
388.45 किमी लांबीचा असलेला हा एक्सप्रेस – वे जो रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून पुढे सिंधुदुर्गात पोहोचेल. नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकण द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. या बहुउद्देशीय एक्स्प्रेसच्या उभारणीमुळे मुंबई – सिंधुदुर्ग दरम्यानचा सध्याचा 6 ते 7 तासांचा प्रवास 3 तासांवर येणार असून फक्त 5 तासांत गोवा गाठता येणार आहे.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने भूसंपादनाबाबत शासन आदेश जारी केला आहे. कोकण ग्रीनफिल्ड एक्सप्रेस – वे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत बांधण्यात येणार आहे. हा एक्स्प्रेस – वे नवी मुंबईतील निर्माणाधीन आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे कोकणातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाणे सोयीचे होणार आहे. हा कोकण एक्सप्रेस – वे सहा पदरी असणार आहे. ज्यावर ताशी 100 किमी वेगाने वाहने चालवता येतील. कोकण द्रुतगती मार्गासाठी 100 मीटर रुंद जमीन संपादित केली जाणार आहे.
4 पॅकेजमध्ये बांधला जाणार कोकण एक्सप्रेस – वे :-
कोकण एक्सप्रेस – वेची एकूण लांबी 388.45 किमी असेल. कोकण एक्सप्रेस – वे चार पॅकेजमध्ये बांधण्यात येणार आहे. पहिल्या पॅकेजमध्ये पेण ते रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेपर्यंत 94.40 किमीचा तर दुसऱ्या टप्प्यात रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीपासून गुहागरपर्यंत 69.39 किलोमीटरचा एक्सप्रेस – वे तर तिसऱ्या टप्प्यात गुहागर ते चिपळूणपर्यंत 122.81 किलोमीटरचा आणि चौथ्या टप्प्यात पत्रादेवी सीमेपासून गोवा राज्याच्या सीमेपर्यंत 100.84 किमीचा एक्सप्रेस – वे बांधण्यात येणार आहे.
4 हजार हेक्टर जमिनीची आवश्यकता. .
या एक्सप्रेस – वेमुळे किनारपट्टीच्या विकासाला चालना मिळेल. ग्रीनफिल्ड कोकण एक्सप्रेस- वेच्या प्रकल्पासाठी तब्बल 70,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 4 वर्षांचा कालावधी लागणार आहे.त्यासाठी 4205.21 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी मार्गाच्या धर्तीवरचं ग्रीनफिल्ड कोकण एक्स्प्रेस – वेची योजना करण्यात आली आहे.
जमिनीची आवश्यकता :- एकूण – 4205.21
रायगड :- 1029.11 हेक्टर
रत्नागिरी :- 2045.28 हेक्टर
सिंधुदुर्ग :- 1130.81 हेक्टर
या तालुक्यांतून जाणार कोकण एक्सप्रेस – वे :-
कोकण एक्सप्रेस – वे रायगड जिल्ह्यातील कोकण एक्सप्रेसवे पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यांमधून जाणार आहे .
पर्यटन विकासाला मिळणार चालना..
कोकणात जलद वाहतूक साधनांसह पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने कोस्टल एक्सप्रेस – वे बांधण्याची योजना आखली आहे. कोकणाला महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणतात. येथे अफाट हिरवळ आहे आणि 500 किमी पेक्षा जास्त किनारपट्टी आहे. ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वेच्या बांधकामामुळे मुंबई ते गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी किनारपट्टीच्या कोकण विभागातील मागास भागांचा विकास होण्यासाठी नवीन मार्ग खुले होणार आहेत. या भागात पर्यटनासोबत उद्योगांना चालना मिळणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगारही मिळेल..