समृद्धी महामार्गालगत होणार 20 नवनगरे, जानेवारीत होणार भूसंचयाला सुरुवात, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर मिळणार 1.50 लाख रुपये मोबदला !
महाराष्ट्रातला बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राज्याच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलणारा समृद्धी महामार्ग रविवारपासून सर्वांसाठी खुला होणार आहे. या महामार्गासोबतच ज्याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे ते म्हणजे कृषी समृद्धी केंद्र.
कृषी समृद्धी केंद्रांच्या उभारणीसाठी महामार्गालगत 20 नवनगरांच्या निर्मितीकार्याला वेग येणार आहे. येत्या नवीन वर्षात संपूर्ण महाराष्ट्रासह धामणगाव शहरालगत चार गावांमधील दोन हजार हेक्टर शेतजमीन भूसंचय पद्धतीने ताब्यात घेतली जाणार आहे.
कशी असतील कृषी समृध्दी केंद्रे..
कृषी समृद्धी केंद्रे अंदाजे 1000 ते 1200 एकर क्षेत्रावर मूलभूत सुविधांनी सुसज्ज असतील. यामध्ये निवासी क्षेत्रासह कृषी आधारित उद्योग, उत्पादन व व्यावसायिक केंद्र विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. आधुनिक शहरी सोयी सुविधांनी सज्ज अश्या या केंद्रांचा विकास केला जाईल. यातील अर्धी जमीन निवासी क्षेत्राला तर 5% क्षेत्र सार्वजनिक वापरासाठी असणार आहे. 20% अंतर्गत रस्त्यांसाठी, 15% व्यावसायिक क्षेत्राला, 10% ग्रीन झोन म्हणून ठेवण्यात येणार आहे.
जमीन खरेदीला येणार वेग..
समृद्धी महामार्गालगत असलेल्या धामणगाव शहराजवळील दत्तापूर , नारंगावडी, जळगाव, आर्वी , आसेगाव या गावांच्या परिसरातील तब्बल दोन हजार हेक्टर शेतजमिनीच्या भूसंचयाला जानेवारी महिन्यात वेग येणार असे दिसत आहे. नव्याने उभारणी होत असलेल्या या नवनगर परिसराचे दत्तापूर असे नामकरण केले जाणार आहे. या नवनागराची लोकसंख्या साधारणतः एक लाख इतकी असेल. या नवनगरात पुढील तीन वर्षात सर्व सोयी – सुविधा उभ्या केल्या जातील सोबतच उद्योग, व्यवसायांची देखील उभारणी होईल.
भूसंचयाला सुरुवात..
या नवनगरांच्या निर्मितीसाठी शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना जिरायती जमिनीला प्रतिहेक्टर 75 हजार रुपये प्रतिवर्ष मोबदला दिला जाणार असून, बागायती जमिनीला 1 लाख 12 हजार 500 रुपये आणि हंगामी बागायती जमिनीला प्रतिहेक्टर 1.50 लाख रुपये मोबदला दिला जाणार आहे. याशिवाय 10 वर्षापर्यंत प्रतिवर्ष या रकमेत 10 टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे .
नागपूर – मुंबई या 701 किलोमीटर लांबीच्या स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी हा टप्पा रविवारी सुरू होणार आहे. या मार्गावर नैसर्गिक वायूच्या पाईपलाईनचे काम 70% पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सौरऊर्जा प्रकल्प, ऑप्टिकल फायबर जाळे तसेच आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाने एक पाऊल पुढे टाकले आहे.
नवीन वर्षात धामणगाव तालुक्यातील 4 गावांची 2 हजार हेक्टर शेतजमीन भूसंचय पद्धतीने घेतली जाणार आहे. तसेच नवनगरात शेतकऱ्यांना भूखंड मिळणार आहेत.राहाता तालुक्यातील सावळीविहिर व कोपरगांव तालुक्यातील धोत्रे येथे ही कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती होणार असून येत्या नव्या वर्षात या गावातही भूसंचय प्रक्रिया केली जाणार आहे.