नवी मुंबईत 1 BHK ला 20 हजार रुपये भाडे, पहा वाशी, पामबीच, नेरुळ, ऐरोली व सीवूड परिसरात किती आहे 1, 2 BHK चे दर..
मुंबईला पर्याय म्हणून 70 च्या दशकात नवी मुंबई शहर वसवण्यात आले. सिडकोने निर्माण केलेल्या या शहरात भाड्याने घर घेणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाही . मागील काही महिन्यांपासून घरमालकांनी भाडे दरामध्ये 25 ते 30 टक्के वाढ केली असून वन बीएचके घरासाठी वाशीमध्ये चक्क 20 हजार रुपये भाडे मोजावे लागत आहे. घर विकत घेणे परवडत नसल्याने आजमितीस हजारो नागरिक भाड्याच्या घरांत वास्तव्य करीत आहेत. परंतु आता घराप्रमाणेच नवी मुंबईतील वाणिज्य व निवासी जागांच्या भाड्याचे दर अवाच्या सवा वाढले आहेत.
सिडको महामंडळाने मालमत्ताचे दर निश्चित केले असले तरी बांधकाम व्यावसायिक मनमानी पद्धतीने प्रति चौरस फूट दर आकारत असल्याने स्वतःच्या मालकीचे घर घेणे. सामान्यांसाठी स्वप्नच ठरत आहे. यामुळे भाड्याचे घर घेण्याचा पर्याय स्वीकारला जात आहे.
वाशी, पामबीच, नेरुळ, ऐरोली व सीवूड परिसरांत सर्वाधिक महागड्या दराने भाड्याने घर दिले जात आहे. तर कोपरखैरणे, घणसोली, रबाळे, तुर्भे या परिसरांत तुलनेने सामान्यांना परवडेल, असा पर्याय उपलब्ध होत आहे. मात्र करार संपल्यानंतर नवीन भाडेकरू आणून भाड्यात प्रति महा 3 ते 5 हजार रुपये वाढ केली जाते.
दलालांचे वर्चस्व
विशेष म्हणजे या व्यवहारात मालमता भाड्याने मिळवून देणाऱ्या दलालाचे वर्चस्व अधिक आहे . घरमालक सर्व व्यवहार या दलालावर सोपवतो . घर भाड्याने घेणारे भाडेकरू प्रामुख्याने चाकरमानी व कामगार वर्ग आहे . घर भाड्याने घेताना संबंधित सोसायटीलादेखील काही रक्कम मोजावी लागत असल्याने या भाडेकरूंना नाहक भुदंड सोसावा लागतो .
झोपडपट्टी परिसरातही भाव वधारला.
दिघा येथील कारवाईनंतर झोपडपट्टी परिसरातील घरमालकांचा भावदेखील वधारला आहे . नावाला झोपडपट्टी असणारा हा परिसर आता टुमदार घरांनी सजल्याने झोपडपट्टी परिसरातदेखील वन रूम किचनचे 5 ते 7 हजार रुपये भाडे आकारले जात आहे.
पूर्वी गावठाण क्षेत्रात अत्यल्प दरात भाड्याने घरे उपलब्ध व्हायची, मात्र आता मागणी वाढल्याने ग्रामस्थांनीदेखील पूर्वीच्या तुलनेत अधिक भाडेवाढ आकारण्यास सुरुवात केली आहे. गावठाण क्षेत्रात 5 ते 6 हजार रुपये मासिक भाडे असलेली घरे सहज मिळायची. मात्र आता या ठिकाणीदेखील 7 ते 8 हजार रुपये भाडे मोजावे लागत आहे. चाळ परिसरातदेखील 4 ते 5 हजार रुपये भाडे घेतले जाते.
कोठे किती भाडे ?
वाशीसारख्या परिसरात वन बीएचकेसाठी 18 ते 19 हजार रुपये प्रति महिना भाडे मोजावे लागत आहे. हीच स्थिती पाम बीच मार्गावरदेखील आहे.
सीवूड्समध्ये 16 ते 17 हजार रुपये वन बीएचकेसाठी प्रति महिना भाडे मोजावे लागत आहे, तर वाशीमध्ये 2 बीएचकेसाठी 22 हजारांपेक्षा अधिक मासिक भाडे आकारले जात आहे.
सदनिकेमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतील तर हेच भाडे आणखी 5 ते 6 हजार रुपयांनी वाढते.
कोपरखैरणे परिसरात माथाडींच्या वसाहतीमध्ये 11 ते 12 हजार रुपये मासिक भाडे आकारले जाते.
पूर्वी हेच भाडे 4 हजार रुपये होते. मात्र माथाडी कामगारांनी मूळ घरावर दोन ते अडीच मजले वाढीव बांधकाम केल्याने या बांधकामापोटी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी घरे भाड्याने दिली आहेत.
वाशी परिसरामध्ये पूर्वी 7 ते 9 हजारांत वन बीएचके घर भाड्याने सहज उपलब्ध होत होते. ऐरोली परिसरात वन बीएचकेसाठी 15 ते 16 हजार रुपये भाडे आकारले जाते.