Mumbai Metro : आजपासून मुंबई मेट्रोमध्ये या प्रवाशांना 25% सूट, ही 2 कागदपत्रे दाखवा अन् स्वस्त दरात करा मुंबई दर्शन..
आज 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य दिन साजरा केला जात असून या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मोठी भेट दिली आहे.
या दिवशी तिन्ही महानगरांमध्ये सवलतीच्या दरात प्रवास करता येणार असला तरी, ही सवलत फक्त मुंबई – 1 पासवरील 45 किंवा 60 ट्रिपसाठी असणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी महाराष्ट्र दिनानिमित्त सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महिलांना बस भाड्यात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती.
25 टक्क्यांपर्यंत मिळणार सूट..
महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मेट्रोच्या भाड्यात 25 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. या श्रेणीतील मुंबई 1 नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड वापरणारे प्रवासी हा लाभ घेऊ शकतात. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) कडून मुंबईकरांना ही भेट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
तिकीट खिडकीत ही कागदपत्रे दाखवा..
मेट्रोमध्ये सवलतीच्या तिकिटांच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा शासकीय प्रमाणपत्र तिकीट खिडकीत दाखवावे लागणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या वयाचा दाखला दाखवावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचे पॅनकार्ड आणि शाळेचे ओळखपत्र तिकीट खिडकीत दाखवावे लागेल.
तुम्ही 2A आणि 7 लाईनच्या तिकीट खिडकीवर या सुविधेचा लाभ घेऊ शकता. याशिवाय, या सवलतीचा लाभ नवीन आणि आधीच खरेदी केलेल्या मुंबई 1 पासमध्ये 45 ते 60 ट्रिपसाठी उपलब्ध असणार आहे.
MMMOCL मेट्रो लाइन्स 2A आणि 7 ची देखभाल करते. 2A (यलो लाईन) दहिसर पूर्वेला अंधेरी पश्चिमेतील डीएन नगरला जोडते. तर, लाईन 7 (रेड लाईन) अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्वेला जोडते.
ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि लहान मुलांच्या गरजा आणि सुरक्षितता लक्षात ठेवणे हा आमचा उद्देश होता. आम्हाला आशा आहे की अधिकाधिक लोक सवलतीच्या दरांचा लाभ घेतील आणि मेट्रोने प्रवास करतील. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.