आधुनिक पद्धतीने शेती करण्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहिला आहे, लहरी निसर्गाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आधुनिक शेतीचा अवलंब करत आहेत.आधुनिक शेतीमध्ये सुधारित वाण, सिंचनाच्या सुधारित पद्धती बरोबर यांत्रिकीकरणाचे देखील तितकेच महत्व आहे. तसेच वेग-वेगळ्या वातावरणाला तोंड देण्यासाठी शेतकरी शेडनेटचा देखील आधार घेत आहेत. यामुळे उत्पन्नात देखील मोठी वाढ होत आहे.

अश्याच प्रकारे आधुनिक शेतीची कास धरत औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी येथील शेतकरी बंडू नारायण पडूळ यांनी काकडीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांनी आपल्या 20 गुंठे क्षेत्रात शेडनेटमध्ये काकडीची लागवड केलेली आहे. काकडीची लागवड केल्यानंतर 40 दिवसांनंतर काकडीचे उत्पन्न सुरू झाले. काकडीच्या उत्पादनातून तीन महिन्यांत 3 लाखांचा निव्वळ नफा मिळेल अशी बंडू नारायण पडूळ यांना अपेक्षा आहे.

शेतकरी बंडू पडूळ यांनी आपली पारंपरिक शेती कंसत असतानाच मोसंबी, कांद्याचे सीड प्लॉट, डाळिंब अशा मार्गाने स्वतःच्या उत्पन्नाचा स्तर वाढवला. त्यांनी आतापर्यंत २० गुंठे शेडनेटमध्ये काकडीची लागवड केले असून आता 40 दिवसांनंतर काकडीची तोडणी देखील सुरु झाली आहे.

सध्या काकडीला 28 रुपये प्रति किलोप्रमाणे भाव मिळत आहे. पुढील दीड महिन्यात एकूण 20 ते 25 टन काकडीची तोडणी होऊन खर्च वजा जाता किमान 3 लाख रुपयांपर्यंतची कमाई अपेक्षित असल्याचे पडूळ यावेळी म्हणाले.

बंडू पडूळ यांनी महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून 40 गुंठे शेडनेट या योजनेचा लाभ घेतला आहे. 40 गुंठ्यात केलेल्या या शेडनेटमध्ये त्यांनी 20 गुंठ्यात काकडी तर उर्वरित 20 गुंठ्यात शिमला मिरचीची लागवड केली आहे. आपल्या शेतीच्या माध्यमातून त्यांनी वर्षभर किमान 10 ते 12 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

बंडू पडूळ यांनी केवळ महाराष्ट्र शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या माध्यमातून ४० गुंठे शेडनेट या योजनेचाच लाभ घेतला आहे असे नाही तर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सोलार पंप योजनेचा देखील लाभ घेतला आहे. या योजने अंतर्गत बंडू पडूळ यांना 3 किलोवॅटचा पंप अवघ्या 16 हजारांत मिळाला आहे. या पंपाची बाजारात किंमत 3 ते 3.50 लाख रुपये इतकी आहे.

यंदा पाऊस समाधानकारक झाला असला तरी ग्रामीण भागात वीजचे भारनियमन सुरूच आहे. अश्या परिस्थितीत सोलारपंपमुळे बंडू पडूळ यांना सिंचनाच्या बाबतीत कोणतीही अडचण येत नाही. परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासत असेल, किंवा विजेची समस्या असेल तर अशा अडचणींणवर मात करण्यासाठी आधुनिक शेतीची कास धरावी, असे पडूळ यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *