स्वतःचं घर विकत घेणं, हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. मेट्रो सिटी मध्ये राहणारे लोकही स्वतःचा फ्लॅट असावा असा विचार करत असतात. भारतातला प्रत्येक तरुण नोकरीच्या माध्यमातून कमाई करू लागताच, सर्वप्रथम घर किंवा फ्लॅट विकत घेण्यावरच भर देतो. मात्र सध्या घरे आणि फ्लॅटच्या वाढलेल्या किंमती पाहून धडकी भरायला होते. त्यामुळे अनेकांना त्यांच्या स्वप्नांतले घर खरेदी करण्यात यश मिळते, तर काही लोकांचे हे स्वप्न उशिरा पूर्ण होते. तर काही लोकांना आर्थिक कारणांमुळे घर घेण्यात अपयश येतं.
घर खरेदी करताना आपली सर्व जमापुंजी त्यामध्ये गुंतवणे टाळले पाहिजे. घर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? जेणेकरून घरही विकत घेतले जाईल आणि कुटुंबाच्या सामान्य गरजांमध्येसुद्धा कसलीही अडचण भासणार नाही. आर्थिक नियोजनाचा अभाव कधीकधी तुम्हाला अडचणीत आणतो. आर्थिक ज्ञानाअभावी अनेक वेळा काय करावे हे समजत नाही. घर खरेदी करताना कोणत्या बाबी लक्षात ठेवायला हव्यात त्याबाबतचे सूत्र असे आहे.
ज्यांना याबाबतचे ज्ञान आहे ते लोक हा फॉर्म्युला सऱ्हास वापरताना दिसतात. अन्यथा घर विक्री करणाऱ्या दलालांपासून बँकांपर्यंत ते कर्ज देण्याची घाई करणाऱ्या लोकांपर्यंत सर्वजण तुम्हाला त्यांच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात. मग EMI तसेच घरखर्चाचे व्यवस्थापन करणे खूपच जिकरीचे ठरते. काही जण याकडे जास्त पैसे कमावण्यासाठीची संधी म्हणून पाहतात. गरज वाढल्या कि माणूस जास्त कमवायचा प्रयत्न करतो असे त्यांचे म्हणणे असते.
घर खरेदीसाठी काय केले पाहिजे आणि आर्थिक नियोजन कसे केले पाहिजे सोबतच सर्वसामान्य गरजांच्या खर्चात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आर्थिक तज्ज्ञांनी लोकांना घर खरेदीचे एक सूत्रही समजावून सांगितले आहे. हा फॉर्म्युला समजून घेण्याबरोबरच किमान सामान्य नागरिकाने त्याचा जीवनात अवलंब केल्यास काही बाबतीत त्याचे कष्ट कमी होतील.
हे सूत्र 3/20/30/40 असे आहे. या फॉर्म्युला अंतर्गत 3 म्हणजे घराची एकूण किंमत असते. घराची किंमत कोणत्याही व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट जास्त नसावी. म्हणजेच वार्षिक 8 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीसाठी घराची किंमत 24 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी.
दुसरा अंक आहे 20. तुमची कर्जाची मुदत 20 वर्षे किंवा त्यापेक्षा कमीच ठेवा. कर्जाचा कालावधी जितका कमी असेल तितका चांगला. कर्ज कमी रकमेचे असावे यासाठीही प्रयत्न केले पाहिजेत. ते जितके कमी असेल तितके चांगले. जर कर्ज कमी कालावधीसाठी असेल तर कमी व्याज द्यावे लागेल. कर्ज कमी रकमेचे असल्यास देखील कमी व्याज द्यावे लागेल.
यानंतर पुढील अंक आहे 30. तुम्ही एका महिन्यात भरलेला EMI तुमच्या एकूण मासिक उत्पन्नाच्या 30% पेक्षा जास्त नसावा हे ठरवणे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही हे लक्षात ठेवावे की गृहकर्ज, कार लोन इत्यादी सर्व कर्जांची ईएमआय त्यात यायला हवी. तुम्हाला याची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही समजू शकता की जर एखाद्या व्यक्तीचे एकूण उत्पन्न वार्षिक 8 लाख रुपये असेल तर तो वार्षिक 240000 चा वार्षिक हप्ता सहन करू शकतो. म्हणजे तो एका महिन्यात जास्तीत जास्त 20000 हजारांचा हप्ता देऊ शकतो.
सूत्रातील शेवटची संख्या 40 आहे. घर खरेदी करताना डाऊनपेमेंट करावे लागते. डाउनपेमेंट किती असावे? हे ही संख्या निश्चित करते. या सूत्रानुसार, घर खरेदी करताना तुम्ही तुमच्या घराच्या एकूण किमतीच्या सुमारे 40 टक्के डाउन पेमेंट करावे. येथे हे देखील स्पष्ट आहे की घर खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे डाउन पेमेंट करण्यासाठी पुरेसे पैसे असले पाहिजेत. हे केल्यावर तुम्ही तुमच्या इतर गरजा वेळेवर पूर्ण करू शकाल.
येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे बँक असो किंवा इतर कोणतीही कर्ज देणारी संस्था, ते सर्व तुम्हाला सांगतील की तुम्ही फक्त 10% डाउन पेमेंट करून घर घेऊ शकता. पण यामुळे तुम्हाला व्याजाच्या रूपात जास्त रक्कम भरावी लागते. या सूत्राचा वापर करून तुम्ही तुमचे घर तर विकत घेऊ शक्यच मात्र त्यासोबतच मोठ्या प्रमाणावर पैशांची बचत देखील करू शकता.