अरे देवा ! राज्यातील तरुणांना आणखी एक मोठा धक्का ; वेदांता-फॉक्सकॉन पाठोपाठ 30,000 कोटींचा 80 हजार नोकऱ्या देणारा ‘हा’ प्रकल्पही गेला !
शेतीशिवार टीम : 14 सप्टेंबर 2022 : शिवसेना – युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. वेदांता – फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातकडे जाण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांनी राज्यातून गुजरात आणि तेलंगणा या राज्यांमध्ये हलणाऱ्या आणखी एका महत्त्वाच्या प्रकल्पाबद्दल माहिती दिली.
वेदांता – फॉक्सकॉन नंतर बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्र बाहेर गेला असून या प्रकल्पासाठी शिंदे सरकारला जबाबदार धरून आदित्य ठाकरे म्हणाले की, या प्रकल्पानेही महाराष्ट्राची साथ सोडल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की नाही ? याबद्दल मलाही शंका आहे.
विधानसभेच्या सभागृहात दीड ते दोन लाख कोटींचा, चार लाख कोटींचा प्रकल्प सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा करायची, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. जून-जुलैपर्यंत हा प्रकल्प महाराष्ट्रात येऊ लागला. पुण्यातील तळेगावात ते ठिकाण त्यांनी पसंत केलं होतं. सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘बाजीगर फिल्म में एक डायलॉग था कि – हार कर जीतने वाले को ही बाजीगर कहते हैं. यहां जीत को हार में बदलने वाले को ‘खोखे सरकार’ कहते हैं. असा हिंदी डायलॉगही त्यांनी म्हटला. हे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असताना मुख्यमंत्री शिंदे गणेशाच्या दर्शनासाठी ठिकठिकाणी फिरत होते.
बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्र सोडून हिमाचल, गुजरात आणि आंध्र प्रदेशातही गेला…
आजच्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील बल्क ड्रग पार्क प्रकल्प सोडल्याचा नवा आरोप शिंदे सरकारवर केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘केंद्र सरकारने बल्क ड्रग पार्कबाबत गुजरात, आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशातून अहवाल मागवला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. ठाकरे सरकारमधील उद्योगमंत्री देसाई यांनी हा प्रस्ताव मंत्रिमंडळात आणला होता.
पण आता हा प्रकल्प हिमाचल प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशात जाणार आहे. पहिला प्रकल्प गुजरातमधील भरुचमध्ये सुरू होणार आहे. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्याने बल्क ड्रग पार्कची मागणी केली होती.त्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा होता पण आता ते महाराष्ट्राच्या बाहेर गेला आहे.
काय होता हा बल्क ड्रग पार्क प्रकल्प :-
बल्क ड्रग पार्क प्रकल्प हा दिल्ली – मुंबई कॉरिडॉर अंतर्गत रायगड जिल्ह्यात उभारणार होता. हा प्रकल्प वैद्यकीय सोयी सुविधा, औषधे, निर्मिती उद्योगाचे पार्क उभारलं जाणार होतं. या प्रकल्पसाठी एकूण 5 हजार एकर जमीन आवश्यक होती. पहिल्या टप्प्यात 2500 एकर जागा संपादित केली जाणार होती. या प्रकल्पासाठी रायगडमध्ये एकूण 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार होती.
हा प्रकल्प उभारला गेला असता तर तब्बल 80 हजार बेरोजगारांना नोकरीची संधी मिळाली असती… तसेच रायगडप्रमाणं संभाजीनगर
च्या बिडकीनमध्ये ही 350 एकरवर बल्क ड्रग पार्क प्रकल्प होणार होता. पण आता रायगड, संभाजीनगर पाठोपाठ संपूर्ण महाराष्ट्राला या मोठ्या 2 प्रकल्पापासून मुकावं लागलं आहे.