यंदाच्या वर्षात नैसर्गिक संकटांना तोंड देणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून विनाअट दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली गेली आहे. तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे दुसऱ्या यादीत केवळ संगमनेर तालुक्यातील 7 हजार 416 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे लवकरच या सर्व शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदानाचा लाभ मिळणार आहे. तालुका विकास अधिकारी अशोक थोरात व इंद्रजीत थोरात यांनी ही माहिती माध्यमांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यासंदर्भात दिलेल्या पत्रकात इंद्रजीत थोरात यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विनाअट सरसकट दोन लाखापर्यंतची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. हा निर्णय घेण्यामध्ये तत्कालीन महसूल मंत्री आमदार थोरात यांचा मोठा हात होता.
या कर्जमाफीमुळे राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटला आहे. तर प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील ५० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मंत्रिमंडळाने घेतला होता.
संगमनेर तालुक्यातील शेतकरी सातत्याने कर्जाची परतफेड करण्यात संपूर्ण महाराष्ट्रात आघाडीवर राहिले आहेत. या वर्षीही जिल्हा बँकेने कर्ज वसुलीची परंपरा जपताना 99.80% कर्ज वसुली केली आहे, जी राज्यात सर्वात जास्त आहे.
कर्जमाफीबरोबरच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना देखील सरकारी योजनेचा लाभ मिळावा याकरीता आमदार थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यामुळेच दुसऱ्या यादीत तालुक्यातील तब्बल 7,416 खातेदारांची यादी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यादीचे जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांमधील आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर लवकरच पात्र ठरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपयांचे अनुदान जमा केले जाणार आहे.