पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर औद्योगिक क्षेत्र असल्याने सातत्याने मोठी वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेकडून मेट्रो उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या प्रकल्पाचा खर्च बजेटच्या बाहेर जात असल्याने आता मेट्रोऐवजी स्वस्त आणि वेगवान असा निओ मेट्रो प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड व खेड तालुक्यातील एमआयडीसी भाग थेट पुणे शहराशी जोडला जाणार आहे.
नाशिक फाटा ते चाकण या मार्गावर सलग व दाट नागरी लोकवस्ती नाही. तर या मार्गावर अनेक ठिकाणी एमआयडीसी भाग आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवाशांची इतर वेळेपेक्षा सकाळी व सायंकाळी अधिक गर्दी असते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच एमआयडीसी कामगारांना या वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करत तासन् तास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते, असे महामेट्रोने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
त्यामुळे या मार्गावर मेट्रोपेक्षा स्वस्त असलेल्या निओ मेट्रोचा प्रस्ताव महामेट्रोकडून ठेवण्यात आला होता. त्याला आता राज्य सरकारने देखील परवानगी दिली आहे. त्यासोबतच पिंपरी- चिंचवड महापालिकेकडे याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) 13 डिसेंबर रोजी सादर केला गेला आहे.
कनेक्टिव्हिटी वाढणार..
येऊ घातलेल्या निओ मेट्रोमुळे चाकण एमआयडीसीतील नागरिकांना व कर्मचाऱ्यांना भोसरी, पिंपरी-चिंचवड, पिंपळे गुरव तसेच हिंजवडी परिसरामध्ये ये-जा करणे अधिक सोपे आणि आरामदायक होणार आहे. शिवाय स्वारगेट ते पिंपरी हा मेट्रो मार्ग आहे आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम देखील वेगात सुरू आहे. त्यामुळे चाकण वरून पुण्याला मेट्रो मार्गाने जात येणार आहे.
नाशिक फाटा ते चाकण निओ मेट्रोमुळे चाकण औद्योगिक पट्ट्याची शहरी भागाशी मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. या मार्गामुळे चाकण एमआयडीसीचा भाग पिंपरी-चिंचवड व पुणे शहराशी जोडला जाईल. त्यामुळे दळणवळणाची दर्जेदार सुविधा उपलब्ध होऊन उद्योगधंद्यांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.
सर्व सुविधांनीयुक्त एलेव्हेटेट स्टेशन उभारले जाणार..
प्रस्तावित नाशिक फाटा ते चाकण या निओ मेट्रो मार्गावर अकरा एलेव्हेटेड स्टेशन उभारले जाणार आहेत. या स्टेशनवर स्वयंचलित जिना, रस्त्याच्या दोन्ही बाजूस उतरण्याची सोय. स्मार्ट शौचालये, तिकीट काउंटर अश्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत.
निओ मेट्रो नक्की आहे तरी काय ?
निओ मेट्रो ही मेट्रोच्या तुलनेत अरुंद असते, तीची लांबी 25 मीटर पर्यंत तर, रुंदी 2.9 मीटर असते. रबरी टायर असलेल्या या ई-बस कम निओ मेट्रोमध्ये 250 प्रवासीक्षमता असते. ही मेट्रो पूर्णपणे इलेक्ट्रिक असून, या मेट्रोला इलेक्ट्रिक ओव्हरहेडद्वारे वीज पुरवठा केला जातो. निओ मेट्रो पूर्णपणे वातानुकूलित असते यामध्ये स्वयंचलित दरवाजे, आरामदायी खुर्ची, प्रवाशांसाठी डिस्प्ले अश्या सुविधा देखील दिल्या जाणार आहेत.
देशामधील दुसऱ्या किंवा तिसऱ्या श्रेणीतील शहरात गर्दीच्या वेळी 15 हजारांपर्यंत नागरिक प्रवास करत असतात. या नागरिकांसाठी वाहतूक व्यवस्था म्हणून निओ मेट्रोची उभारणी केली जाते. निओ मेट्रो ही जवळ जवळ मेट्रोसारखीच असते. त्यासाठी वेगळा मार्ग देखील उभारला जातो. स्टेशन, कोच व इतर सोयीसुविधा या सर्व मेट्रोसारख्याच असतात. फक्त निओ मेट्रो ही रुळावरून न चालता रबरी टायरवर चालते.
निओ मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल पिपरी-चिंचवड महापालिकेला सादर केला गेला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 1548 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. निओ मेट्रोचे काम पूर्णत्वास आल्यानंतर चाकण परिसर पुण्यातील शहरी भागाशी जोडला जाणार आहे.
असा असणार निओ मेट्रोचा आराखडा..
16.11 किलोमीटरचा हा प्रस्तावित मार्ग नाशिक फाटा ते चाकणपर्यंत उभारण्यात येणार आहे. महामेट्रोने नाशिक फाटा ते चाकण मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिकेच्या मान्यतेसाठी सादर केला होता. त्यासाठी 1 हजार 548 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
या मार्गामुळे चाकण एमआयडीसीचा भाग पिंपरी-चिंचवड व पुणे शहराशी जोडला जाईल. त्यामुळे दळणवळणाची दर्जेदार सुविधा उपलब्ध होऊन उद्योगधंद्यांना चालना मिळेल. असा दावा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
चाकण ते भोसरी असे असणार 11 स्टेशन्स..
चाकण चौक येथून स्टार्ट होऊन तळेगाव चौक, मुक्तेवाडी, आळंदी फाटा, कुरुळी, चिंबळी फाटा, बर्गे वस्ती, भारतमाला चौक, बनकर वाडी, पीआयसी सेंटर, भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटर (पूर्व) पर्यंत असणार आहे.