रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या व्हिजनरी ध्येयामुळे भारतातील दळणवळणाने कात टाकली आहे. भारतातील रस्त्यांचे रुपडे पालटले आहेत. रस्ते हे भारतातील तरुणांसाठी प्रगतीचे नवीन दालनं उघडत आहेत. वेगवान आणि प्रगतीचं साधन म्हणून रस्ते देशाला नवीन दिशा देण्याचे काम करत आहेत.
महाराष्ट्र राज्य एवढ्यावरच थांबलेले नाही. महाराष्ट्रातल्या नागपुरात महामार्ग त्यावर उड्डाणपूल आणि या सर्वांच्या वर मेट्रो धावत आहे. तंत्रज्ञानाचा शक्य तो सारा उपयोग करुन घेत देशात एक नवीन प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यामुळे एकाचवेळी दळणवळणाची अनेक साधनं एकाच जागेवरून, एकाच वेळी मार्गाक्रमण करताना दिसणार आहे.
नागपूर मेट्रोने इतिहास रचताना आशिया खंडातील कुठलाही देश करू शकला नाही असे काम केले आहे. नागपूर मेट्रोने डबल डेकर व्हायाडक्ट मेट्रो बनवून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 3.14 किमी च्या या बांधकामाने संपूर्ण जगाला चकित केले. यामध्ये 8 लेन हायवेच्या वर 6 लेनचा उड्डाणपूल आणि त्यावरून धावणारी मेट्रो असे गुंतागुंतीचे काम नागपूर मेट्रोच्या अभियंत्यांनी शक्य करून दाखवले.
3-टियर ट्रांसपोर्टेशन सिस्टम
नागपूर मेट्रोच्या डबल डेकर व्हायाडक्टचे बांधकाम आश्चर्यकारक असेच म्हणावे लागेल. नागपूर मेट्रोच्या वर्धा रोडवर केलेले हे बांधकाम पाहून जगभरातील अभियंते देखील आश्चर्यचकित झाले आहेत. 3140 मीटर लांबीच्या या डबल डेकर व्हायाडक्ट मार्गावर 3 मेट्रो स्टेशन आहेत. छत्रपती नगर, जय प्रकाश नगर आणि उज्ज्वल नगर मेट्रो स्थानकांसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. या डबर डेकर व्हायाडक्टच्या ग्राउंड लेव्हलवर महामार्ग आहे. त्यावर उड्डाणपूल असून त्याच्यावर मेट्रोचे ट्रॅकही बांधण्यात आले आहेत. अभियंत्यांनी 3-स्तरीय वाहतूक व्यवस्था तयार करून एक नवीन पर्याय जगासमोर ठेवला आहे.
गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद ?
या कामासाठी अभियंत्यांनी भूसंपादन न करता मेट्रो ट्रॅक तयार करून बांधकामाचा वेळ तसेच प्रकल्पाचा खर्च देखील कमी केला आहे. देशातील अशा प्रकारचे हे पहिलेच बांधकाम असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः नागपूर मेट्रो आणि त्यामध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांची प्रशंसा केली. नागपूर मेट्रोच्या या अप्रतिम बांधकामाला प्रथम इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये, नंतर एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले आहे.
आता याचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तथापि, हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे काम सोपे नव्हते. पहिला महामार्ग त्यावर उड्डाणपूल आणि नंतर मेट्रोचा ट्रॅक बांधणे हे मोठे आव्हानात्मक काम होते. या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली केली होती.
काय आहे विशेषता
3.14 किमी वायडक्टपैकी 2.7 किमी रस्ता चौपदरी आहे. यातील ५०० मीटरचा भाग ६ लेनचा आहे. उड्डाणपुलाची उंची 9 मीटर आहे. त्याच वेळी, मेट्रो ट्रॅकची उंची 20 मीटर आहे. या ट्रॅकवर तीन मेट्रो स्टेशन आहेत. हा ट्रॅक आर्किटेक्टचा एक अद्भुत नमुना आहे. त्याच्या बांधकामासाठी सध्याच्या उड्डाणपुलाचा खांब पाडून त्याचे एकाच पिलरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. उड्डाणपूल आणि मेट्रोचा ट्रॅक सिंगल पिलरवरच बांधण्यात आला आहे. असे बांधकाम असलेले हे भारतातील पहिलेच बांधकाम आहे.
प्रकल्प खर्चात 40% बचत
एकाच खांबावर बांधल्याने या प्रकल्पामध्ये पैसा आणि जमीन दोन्ही गोष्टींची बचत झाली आहे. यासाठी काम करणाऱ्या अभियंत्यांचे कौतुक करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, यामुळे NHAI चा 20 टक्के आणि नागपूर मेट्रोचा 20 टक्के खर्च वाचला. म्हणजेच दोन्ही एकत्र करून एकूण 40 टक्क्यांची बचत झाली आहे.