महाराष्ट्रात यंदा सर्वच भागात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच सप्टेंबर व ऑक्टोंबर महिन्यात भोकरदन तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे देखील सर्वच खरिप पिकाचे नुकसान मोठे झाले होते. या वेळी खरीपातील जवळ-जवळ एक लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने भोकरदन महसूल प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून, सादर अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. याची शासनाने देखील गंभीर दखल घेतली आहे.
ऐन दुष्काळामध्ये हवालदिल झालेल्या भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. याचे कारण म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात 74,08,75,580 रुपये मंजुर केले आहेत. त्यामुळे हे अनुदान शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे, यासाठी महसूल प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत.
यंदा भोकरदन तालुक्यात खरिपाच्या हंगामात पावसाने समाधानकारक हजेरी लावली होती. परिणामी खरिप हंगामातील पिके चांगलीच जोमात आली होती. परंतु , निसर्गाने डाग केला आणि यंदा देखील सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पावसाने हाहाकार केला.
सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात लागून राहिलेल्या पावसाने खरिप पिकाचे मोठे नुकसान झाले. अनेक भागात पाणी साचल्याने काढणीला आलेले सोयाबीन पिक पूर्णपणे वाया गेले. शिवाय वादळी वाऱ्यामुळे शेकडो हेक्टरवरील मका पिक जमीनदोस्त झाले होते.
तर कपाशीच्या शेतात पाण्याचे अक्षरशः तळे साचले होते. त्यामुळे कपाशीच्या केर्या देखील काळ्या पडल्या होत्या. ऐन काढणीच्या काळातच निसर्गाने घाला घातल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. शिवाय अधिक पावसामुळे नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणारे मिरचीचे देखील खूप नुकसान झाले होते.
या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी लोकप्रतिनीधी, विविध सामाजिक संघटना, शेतकरी आदिनी केली होती. त्याला आता फळ आले आहे असे म्हणावे लागेल.