नगर-पुणे महामार्गावर शिरूर ते पुणे यादरम्यान प्रवाश्यांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र प्रवाश्यांना आता ही समस्या जास्त काळ सतावणार नाहीये, कारण लवकरच वाघोली ते शिरुर दरम्यान दुमजली पुलासह 18 पदरी रस्त्याचे काम सुरू होणार आहे. त्यातच हा रास्ता दुमजली असल्याने शिरूर आणि परिसरातील नागरिकांसाठी कुतूहलाची गोष्ट असणार आहे.
पुणे – नगर राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने होणारी वाहतुक कोंडी येथील प्रवाश्यांसाठी जीवघेणी समस्या ठरत आह, ही समस्या सोडविण्यासाठी खासदार डॉ . अमोल कोल्हे आणि शिरुर हवेलीचे आमदार अँड. अशोकबापू पवार यांनी सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. अखेर याची दखल घेत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याला केवळ मंजूरीच दिली नाही तर प्रत्यक्षात कामाला लवकरात लवकर सुरुवात होईल असे नियोजनही केले.
याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बहुचर्चित अशा या रस्त्याच्या डीपीआर बनविण्याच्या कामाला आता लवकरचं सुरुवात होणार आहे. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेसाठीची निविदा प्रक्रीया पूर्ण झाली असून या कामाला लवकरच गती मिळणार आहे.
नुकत्याचं अहमदनगर येथील उड्डाणपूलाचे उद्घाटनप्रसंगी गडकरी यांनी वाघोली ते शिरुर दरम्यानच्या या कामाला उल्लेख करुन लवकरात लवकर हा रस्ता होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. वाघोली ते शिरुर दरम्यान 56Km चा हा दुमजली पुलासह 18 पदरी रस्ता पूर्णत्वास आल्यानंतर वाघोली, कोरेगांव भीमा, शिक्रापूर वाहतुक कोंडीची समस्या कायमची मिटणार आहे.
कसा असेल रस्ता
सर्वप्रथम भूसंपादनात येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन हा रस्ता तयार होत असताना नागपूरच्या धर्तीवर ‘ एलिव्हेटेड ‘ रस्ता बांधण्यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले होते. त्यानुसार डीपीआर बनविण्याच्या कामाला देखील सुरुवात झाली होती, मात्र भविष्यातील या मार्गावरची वाढती गरज लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी दुमजली पुलासह 18 पदरी रस्ता बांधण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
यात एकुण तीन मार्ग असतील यातील जमीनीवरील रस्ता 6 पदरी असणार आहे, त्यावर दुमजली पूल उभारला जाणार असून या पुलावरही प्रत्येकी 6-6 लेन असणार आहेत . त्यामुळे हा रास्ता एकुण 18 पदरी होणार आहे. यामुळे पुणे ते शिरुर आणि शिरुर ते अहमदनगर हे अंतर देखील आता अत्यंत कमी होणार आहे. सोबतच नवीन पुणे ते औरंगाबाद हा एक्सप्रेसवे देखील होणार असल्याने साहजिकचं या भागातील वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे .
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीतच या महामार्गाच्या कामाचे सादरीकरण केले गेले होते. मात्र त्यानंतरही काम अपेक्षित गतीने पुढे सरकत नसल्याने शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची मागणी केली होती.
अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) निवडीसाठीच्या निविदा प्रक्रीयेला आता मंजूरी मिळाली असून पीएमसी निवडीसाठीची निविदा प्रक्रीयाही पार पडली आहे, असे कोल्हे यांनी सांगितले आहे.
वाघोली, कोरेगांव भीमा, शिक्रापूर पर्यंत वाहतूक कोंडी सुटणार..
या रस्त्याचे काम सुरु झाल्यास आणि हा रस्ता पूर्णत्वास आल्यानंतर वाघोली, कोरेगांव भीमा, शिक्रापूर येथील वाहतुक कोंडीची समस्या कायमची सुटणार आहे. तर पुण्यावरून शिरूर पर्यंत पोहचण्याचा वेळही अत्यंत कमी होणार आहे.
एकुणच या रस्त्यामुळे या भागातील वाहतुकीला गती तर मिळेलच पण सोबतच पुणे – शिरुर दरम्यान असलेल्या औद्योगिक वसाहतींना या गतीमान दळणवळणाचा नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळे शिरूर आणि परिसरातील सर्व नागरिक या रस्त्याचे काम होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.