Take a fresh look at your lifestyle.

7th Pay Commission : मनपा कर्मचाऱ्यांची 6 वर्षांची प्रतीक्षा संपली, शासनचा नवा GR आला, पगारात होणार 20 टक्क्यांनी वाढ..

0

महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची तब्बल सहा वर्षांपासूनची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत अंमलबजावणी करावी, असे मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना आदेशित केले आहे.

त्यामुळे कर्मचाऱ्यांना 2016 पासूनच्या वेतन फरकासह 20% पगारवाढ मिळणार असल्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. केंद्र सरकारने 2016 मध्ये सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग लागू केला होता.

त्यानुसार राज्य सरकारनेही राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केला. मात्र, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना आयोगाच्या शिफारसी लागू करण्यास मान्यता मिळालेली नव्हती. लातूर शहर महापालिकेने 29 ऑगस्ट 2019 रोजीच्या सर्वसाधारण सभेत विषय क्र. 3 व ठराव क्र. 98 अन्वये मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 नुसार सातव्या वेतन आयोगाची सुधारित वेतनश्रेणी व इतर सर्व शिफारसी राज्य शासनाच्या विहित अटी व शर्तीच्या अधिन राहून लागू करण्यास मंजुरी दिली आहे

संदर्भाधीन पत्र क्र. 3 ते 5 नुसार मनपा आयुक्तांनी शासनास प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास नगरविकास विभागाने मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय 6 डिसेंबर रोजी निर्गमित केला आहे.

याकरिता शासन निर्णय क्र. 1 अन्वये विहित केलेली कमाल 35 टक्के इतकी आस्थापना खर्चाची अट शिथील करण्यात येत असल्याचे अध्यादेशात म्हटले आहे

सत्ता बदलानंतर तत्कालीन महापौर विक्रांत गोजमगुंडे , उपमहापौर चंद्रकांत बिराजदार व नगरसेवक यांनी सातत्याने याबाबतची मागणी लावून धरलेली होती व महसूल खर्चाची 35 टक्क्यांची अट शिथिल करण्याची मागणी केली होती. याकामी लातूर जिल्ह्या ” माजी पालकमंत्री अमित देशमुख यांनी देखील शासनाकडे पाठपुरावा केला होता.

त्यास राज्य शासनाने अनुकूल प्रतिसाद देत मान्यता प्रदान केली आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी राज्य शासन तसेच माजी पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार व्यक्त केले आहेत.

कर्मचाऱ्यांना दिलेले वचन पूर्ण झाल्याचा आनंद लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदाचे सूत्र स्वीकारले तेंव्हा अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन सहा महिन्यांपासून थकलेले होते. परंतु अडीच वर्षांच्या कार्यकाळात मनपाचे आर्थिक घडी बसवता आली. महिन्याच्या पहिल्या तारखेस सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन सुरळीत अदा करण्यास सुरुवात केली. याचबरोबर राहिलेल्या पेन्शनदेखील अदा करण्यात आल्या.

मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी दिलेले वचन पूर्ण करता आले, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. याकामी सर्व पदाधिकारी व नगरसेवकांचेही सहकार्य मिळाले. यामुळे तब्बल साडे आठशे कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार असून वेतनामध्ये मासिक 20 टक्के वाढ झाल्यामुळे यापुढे कर्मचाऱ्यांनादेखील आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे .

– विक्रांत गोजमगुंडे , माजी महापौर, लातूर..

Leave A Reply

Your email address will not be published.