सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी श्रम आणि कमी खर्चात उत्पादन कसे वाढवता येईल यावर शेतकरी दिवसेंदिवस भर देताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील अनेक तरुण शेतकरी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली एकरी लाखो रुपयांचं उत्पादन घेत आहेत. हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी देखील असेच काही करुन दाखवलं आहे.
शेतीमध्ये लागणाऱ्या खर्चाला कंटाळून, कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळवता येईल याचा विचार करत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेल्या वारंगा तर्फे नादापूर येथील काही शेतकऱ्यांनी एक शेतकरी गट तयार केला. वीस शेतकऱ्यांच्या या गटाला उन्नती शेतकरी गट असे नाव दिले गेले, आणि या शेतकऱ्यांनी गट शेतीला सुरवात केली.
मे 2022 मध्ये स्थापना केलेल्या या या शेतकरी गटाने आज मोठी भरारी मारली आहे. हा गट यशस्वी होण्यामागे पाणी फाउंडेशन या संस्थेचा देखील मोठा हातभार आहे. पाणी फाउंडेशनने नांगरणी पासून ते पीक काढणीपर्यंत वेळोवेळी कार्यशाळा घेऊन योग्य ते मार्गदर्शन देत रासायनिक खत व रासायनिक औषधींचा वापर न करता शेती कशी करावी हे सांगितले.
या गटातील शेतकरी विशाल सूर्यभान इंगळे यांनी फुले संगम (KDS) सोयाबीनच्या या वाणाची एकरी 17 किलो लागवड केली. यातून त्यांना विक्रमी 19 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळालं आहे. विशाल इंगळे यांच्यासोबतच गटातील इतरही सर्व शेतकऱ्यांनी कधी नव्हे ते 15,16,17 ते 18 क्विंटल पर्यंत सोयाबीनचे उत्पादन घेतलं. त्यामुळे सध्या या शेतकरी गटाची चर्चा सर्व महाराष्ट्रभर होताना दिसत आहे.
आमचं शेत बघायला गावातली लोकं येतात. मला आदरपूर्वक विचारतात, बियाणं कोणतं वापरलं, खतं कोणती वापरली. तेव्हा एकदम मन भरून आल्यासारखं वाटतं. सुरुवातीला गावातली लोकं काय पण कुटुंबातील सदस्य सुद्धा या गटशेती, विषमुक्तशेती अश्या प्रकारच्या शेती पद्धतीच्या विरोधात होती. “हे गटशेतीचं फॅड सोडून दे, रासायनिक खतं आणि औषध न वापरता शेती होणे शक्य नाही ? कसल्याही प्रकारचं उत्पन्नचं निघणार नाही,” असं त्यांना वाटायचं.
खूप विनंती करून घरच्यांकडून एक एकर शेत कसायला घेतलं आणि शेतीचा श्रीगणेशा केला. दशपर्णी आणि लिंबोळी अर्क घरीचं तयार करुन फवारालं होतं तेव्हा मनात एक शंकेची पाल चुकचुकली होती. चांगल उत्पन्न आलं नाही तर काय होईल.
घरच्यांच्या गावातल्या लोकांच्या बाता ऐकाव्या लागतील असं पूर्वी वाटायचं, मात्र प्रयत्नांना यश येत असल्याचे पाहून आणखी हुरूप आला. असे उन्नती शेतकरी गटाचे सदस्य शेतकरी विशाल इंगळे यांनी यावेळी आपला अनुभव सांगितला.
सुरवातीला, शेती करताना काही अडचण आली तर कुणाला विचारायचं हा प्रश्न नेहमीच डोक्यात घर करून असायचा. पण आता शेती शाळेमुळे सगळं काही सोप्प झालंय.
या शाळेत तज्ञांनी जे काही मार्गदर्शन केलं, त्यानुसार कामं करत गेलो आणि आज सोयाबीनच्या पिकात एकरी 50,000 रुपयांपेक्षा जास्त फायदा झाला आहे. पूर्वी एकरी 8 क्विंटल इतकं उत्पादन व्हायचं. आता दुप्पटीपेक्षाही अधिक उत्पादन झाल्याच पाहून सगळ्यांच शेतकऱ्यांचं या शेतीपद्धतीबद्दलचं मत बदलल आहे.
आता उरलेली चार एकर शेती सुद्धा विषमुक्त करायची असे घरचे म्हणत आहेत. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, माझं घराचं अर्धवट राहिलेलं बांधकाम देखील मी आता पूर्ण करू शकणार आहे. या शेतीमुळं मी आता एक यशस्वी शेतकरी आहे, असं सांगायला अभिमान वाटतो.”, असे विशाल इंगळे म्हणाले.