कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान होणाऱ्या महामार्गासाठीचे भूसंपादन जवळ – जवळ पूर्ण झाले असून या भागातील 964 शेतकऱ्यांना पहिल्या टप्यात तब्बल 336 कोटी 81 लाख रुपयांचा मोबदला मिळाला आहे. उर्वरित असलेला 850 कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध झाला आहे.
लवकरच हा निधी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केला जाणार आहे. भूसंपादनासाठीची सर्वच रक्कम उपलब्ध झाल्याने सर्वच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गाची 5 वर्षांपासून सुरू असणारी भूसंपादनाची प्रक्रिया अखेर यंदा पूर्ण झाली. कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गासाठी आंबा ते चोकाक या 74 कि.मी. अंतरासाठी 332.67 हेक्टर जमीन संपादित केली गेली आहे. या भागातील भूसंपादनासाठी प्रतिगुंठा 2 ते 2.50 लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गासाठी एकूण 49 गावांतील 12 हजार 608 खातेदारांची तब्बल 24 लाख 10 हजार 260 चौ.मी. जमीन संपादित केली गेली आहे. या भूसंपादनासाठी 1290 कोटी 38 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती.
पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या 344 कोटी 59 लाख रुपये रकमेपैकी 336 कोटी 81 लाख रुपयांचे आतापर्यंत वाटप झाले आहे. राहिलेला दुसऱ्या टप्प्यातील 852 कोटी 12 लाख 46 हजार 385 रुपयांचा निधी नुकताच उपलब्ध झाला आहे. लवकरच त्याचे शेतकऱ्यांमध्ये वाटप केले जाईल. हा निधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून जिल्हा प्रशासनाला वर्ग करण्यात आला आहे.
या चौपदरी महामार्गासाठी शाहूवाडी तालुक्यातील सर्वात जास्त 25 गावांतील 6 हजार 145 खातेदारांची जमीन संपादित केली गेली आहे. तर पन्हाळा तालुक्यातील 10 गावांतील 1 हजार 937 खातेदारांची जमीन संपादित करण्यात आली आहे.
त्याचबरोबर करवीर तालुक्यातील 9 गावांतील 3 हजार 155 खातेदारांची जमीन संपादित झाली असून हातकणंगले तालुक्यातील एकूण 6 गावांतील 1 हजार 231 खातेदारांची जमीन संपादित करण्यात आली आहे. अश्याप्रकारे एकूण 12 हजार 608 खातेदारांची 24 लाख 10 हजार 260.30 चौरस मीटर जमीन संपादित झाली आहे.
या मोबदल्यासाठी भूसंपादनाचे 852 कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले असून NHI चे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की, शेतकऱ्यांनी कागदपत्रांसह त्वरित जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून आपल्या नुकसानभरपाईचा लाभ घ्यावा..
कोल्हापूर ते रत्नागिरी चौपदरीकरणातील तालुका निहाय गावांची नावे पहा..
शाहूवाडी तालुक्यातील 24 गावे :-
आंबा, तळवडे, केर्ली, निळे, करुगळ, येलूर, जाधववाडी, पेरीड, कोपरडे, चनवाड, ससेगाव, करंजोशी, भैरीवाडी, सावे, गोगवे, बांबवडे, उमकेवाडी, वाडीचरण, डोगोली, खुलटाळवाडी आदी गावांचा समावेश आहे.
पन्हाळा तालुक्यातील 10 गावे :-
आवळी, पैजारवाडी, देवाळे, नावली, बोरपाडळे, नेबापूर, आंबवडे, पिंपळे, दानेवाडी, कुशिरे आदी गावांचा समावेश आहे.
करवीर तालुक्यातील 8 गावे :-
केर्ले, पडवळवाडी, केर्ली, निगवे दुमाला, भुयेवाडी, भुये, जठारवाडी, शिये आदी गावांचा समावेश आहे.