पेरू कुणाला आवडत नाही. पण पेरू म्हटले की बिया आल्याच. पेरूतल्या बियांमुळे अनेकदा पेरू खाण्याची मजा त्यातून निघून जाते. आणि ज्या लोकांना दातांचे दुखणे आहे असे लोक इच्छा असूनही पेरूची चव चाखण्यापासून वंचित राहतात. त्यामुळे ही गरज ओळखून कमी बिया असणाऱ्या पेरूची लागवड करण्यावर शेतकरी भर देत आहेत.
असेच एक शेतकरी म्हणजे कृष्णकांत ऊर्फ आबा वसंतराव रासकर. आबा रासकर मूळचे पुरंदर तालुक्यातील खळदचे रहिवासी आहेत. आबा रासकर सध्या पुण्यात राहत असले तरी त्यांनी खळद आणि अकलूजजवळील श्रीपूर येथे शेतीमध्ये अभिनव प्रयोग करत पेरूची नवीन व्हरायटी रेड सीडलेसची यशस्वी लागवड केली आहे.
मूळची थायलंड येथीलअसलेली रेड सीडलेस ही पेरूची नवीन जात आहे. या पेरूचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अगदी नाही म्हणून केवळ तीन ते चार बिया आहेत. आणि विशेष म्हणजे, या चार बियादेखील खूप मऊ आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तींनी दातांच्या समस्येमुळे किंवा बियांच्या त्रासामुळे गेल्या 20 ते 25 वर्षांमध्ये पेरू खाल्ला नाही ते देखील या पेरूचा आस्वाद घेऊ शकतात.
या पेरूमध्ये पेरू आणि कलिंगडाचे मिश्रण आहे. हा पेरू चवीला थोडा अधिक गोड आणि अधिक चवदार लागतो. परंतु विशेष म्हणजे हा पेरू थोडा जास्त पिकल्यानंतर चक्क कलिंगडाची चव देतो. ज्या लोकांनी बऱ्याच वर्षांपासून पेरू खाल्ला नाही असे हौशी लोक या पेरूची आवर्जून मागणी करताना दिसतात.
या पेरूला सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. खास निर्यात करण्यासाठी आम्ही या पेरूची लागवड केली होती. मात्र, महाराष्ट्र आणि इतर राज्यांतूनच या पेरूला इतकी मागणी आहे की, मालाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे, असे आबा रासकर यांनी सांगितले.
आबा रासकर यांनी सांगितले की, मालाची विक्री करण्यासाठी त्यांना कुठेही जाण्याची गरज भासत नाही. मालाचे दर्जेदार उत्पन्न घेतल्यामुळे गोवा, केरळ, दिल्ली, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि मुंबई या ठिकाणचे व्यापारी थेट शेतात येऊन मालाची खरेदी करतात. सध्या बागेतून दररोज दोन ते तीन टन मालाचे उत्पादन होत आहे. पॅकिंग साठी पेरू 18 ते 20 किलोच्या बॉक्समध्ये पॅक केले जात असल्याने शेतातच व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात आहे. यामुळे वाहतुकीचा मोठा खर्च वाचत आहे.
रासकर यांचा पेरू व्यापारी खरेदी करून परराज्यात तसेच दुबईला देखील निर्यात करत आहेत. रासकर यांनी तब्बल 40 एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रावर पेरूची लागवड केली असून यामध्ये 20 एकर क्षेत्रात रेड सीडलेस पेरू, 10 एकर क्षेत्रावर तैवान आणि 10 एकर क्षेत्रामध्ये व्हीएनआर पेरूची लागवड केली आहे.
पेरूची लागवड, औषधे, खते आणि पाणी हे पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञान वापरून अर्थात ऑटोमायझेशन पद्धतीने केले गेले आहे. व्हीएनआर जातीच्या पेरूची टिकवणक्षमता ही सर्वात जास्त म्हणजे 8 ते 10 दिवस इतकी आहे. तर रेड सीडलेसची सर्वात कमी 5 ते 6 दिवस इतकी आहे. आणि तैवान जातीच्या पेरूची टिकवण क्षमता ही 6 ते 8 दिवस इतकी आहे. या सर्व बागांमधून पेरूचे एकरी 15 ते 20 टन इतके उत्पन्न आबा रासकर यांना मिळते.
आबा रासकर यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते शेतीमध्ये विविध प्रयोग करण्यासाठी पिकांच्या विविध जाती केवळ देशातूनच नाही तर परदेशातूनही आणून त्यांची लागवड करतात. त्यांच्याकडे असणाऱ्या एकूण 225 एकर क्षेत्रापैकी 40 एकर क्षेत्रावर त्यांनी पेरूची लागवड केली आहे. तर 10 ते 11 महिन्यांत तोडणीस येणाऱ्या आणि एकरी 60 टन उत्पादन मिळणाऱ्या उसाच्या आधुनिक जातीचीही लागवड केली आहे.
ते आपल्या सर्व शेतीस पाटाचे पाणी न देता शेती ठिबक सिंचनवर करत आहेत. यासाठी त्यांनी तब्बल 8 एकर क्षेत्रामध्ये तलावाची निर्मिती केली असून त्यामध्ये 20 कोटी लीटर पाण्याची साठवण केली जाऊ शकते.
रासकर यांच्या सर्वच शेतीचे अत्याधुनिक पद्धतीने सिंचन केले जाते. पाटाच्या पाण्याच्या तुलनेत अवघ्या पंधरा ते वीस टक्के पाण्याचा वापर त्यांच्या शेतीमध्ये केला जातो त्यामुळे त्यांची शेती पाहण्यासाठी व मार्गदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रसह देशातील इतर राज्यांतूनही शेतकरी येत असतात. असे असले तरी आबा रासकर स्वतःही नेहमीच नवनवीन येणाऱ्या पिकांच्या जाती कृषी विद्यापीठांशी संलग्न राहून विविध पिकांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतात.
त्यांचे बंधू नितीन रासकर हे नुकतेच आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतून उपसचिव पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचेही आबा यांना मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. नितीन रासकर आणि आबा रासकर यांचे कुटुंब परिसरात प्रगतिशील शेतकरी कुटुंब म्हणून ख्यातीप्राप्त आहे.
खाण्यासाठी अतिशय गोड असलेल्या रेड सीडलेस या पेरूमध्ये फ्रूकटोसचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शुगरचे पेशंटदेखील हा पेरू आरामात खाऊ शकतात. मात्र, या पेरूमध्ये काही दोष देखील आहेत. यामध्ये पेरूच्या झाडाला कळी मोठ्या प्रमाणात लागते. मात्र, थंडी आणि उन्हाळ्यामध्ये ती टिकाव धरत नाही. या झाडाची जवळपास 75 टक्के कळी गळून पडते.
असे असले तरी या पेरूस इतर नियमित पेरूंपेक्षा दीड ते दोन पट अधिक भाव मिळत असल्याने गॅप भरून निघतो. हा पेरू खरेदी करण्यासाठी व्यापारी वेटिंगवर असतात. महाराष्ट्रातील इतर भागातील हवामान या पेरूच्या रोपांसाठी पोषक नाही. त्यामुळे या रोपांची लोणावळा, महाबळेश्वर, केरळ आणि कर्नाटक येथे लागवड सुरू करण्यात आली आहे.
Taiwan Pink Guava plant jast 20 rupees per :- https://www.indiamart.com/proddetail/taiwan-pink-guava-plants-20436155691.html