राज्यात जून ते सप्टेंबर कालावधीपर्यंत अतिवृष्टी, सततचा पाऊस, पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. सोयाबीन, कपाशीसह कांदा, उडीद, तूर पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. अशा वातावरणात संत्रा बागायतदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत अंबिया बहार संत्रा खरेदीचा प्रारंभ बाजार समितीच्या प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या संत्र्याला 20 ते 25 हजार रुपये प्रतिटन विक्रमी भाव मिळाला आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे माजी सभापती व शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे, पंचायत समिती सभापती महेंद्र गजबे, माजी पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुरेश आरघोडे, उपसभापती चंद्रशेखर मदणकर, संचालक दिनेश्वर राऊत, जानराव ढोकणे, रमेशपंत शेटे, घनशाम फुले, अशोक राऊत, अरुण वंजारी, संचालक तथा व्यापारी मुशीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाजार समिती सभापती सुरेश आरघोडे यांच्या हस्ते लिलावासाठी प्रथम संत्र्याची खेप घेऊन आलेल शामू क्षीरसागर याच्यासह अन्य शेतकऱ्याचा दुपट्टा, टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
बाजार समितीत पहिल्या दिवशी सुमारे 300 गाड्यांची आवक झाली. 55 शेतकऱ्यांचा हा माल होता. संत्र्याला 20 ते 25 हजार रुपये प्रतिटन विक्रमी भाव मिळाला.
यावेळी बाजार समितीचे अडते व्यापारी ललन प्रसाद शाह, विलायतीलाल सहगल, दीपक खत्री, ओमप्रकाश मैनानी, रामराव सोमकुंवर, अशपाक पठाण, हादी काजी, शेख सादिक, मुस्ताक पठाण, विनोद भिसे, बाजार समिती सचिव सतीश येवले, राधेशाम मोहरिया, सुनील कडु, अमोल ठाकरे, बाजार समिती कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.