Farmer’s Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी कितीही कठीण परिस्थिती असेल तर त्यावर मात करतोच. शिवाय आता शेती व्यवसायामध्ये अनेक तरुण उतरत आहेत. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि सुयोग्य नियोजन यांची सांगड घालून हे तरुण शेतकरी विक्रमी उत्पन्न घेतात. असेच काहीसे करून दाखवले आहे, इंदापूर तालुक्यातील शहा (महादेवनगर) येथील एका तरुण शेतकऱ्याने..
दीड एकरात केळी व झेंडूच्या अंतरपिकातून या शेतकऱ्याने 15 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवले आहे. या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे नागेश चंद्रकांत चोपडे. नुकत्याच इंदापूर येथे झालेल्या कृषी प्रदर्शनात नागेश यांच्या आधुनिक केळी उत्पादनाची यशोगाथा शेतकऱ्यांना देखील भावली होती.
शेतकरी नागेश चोपडे यांनी त्यांच्या दीड एकर क्षेत्रात केळीचे तब्बल 55 टन उत्पन्न घेतले आहे. एवढेच नाही तर अंतर पीक म्हणून लावलेल्या झेंडूचे सुद्धा त्यांना 10.25 टन उत्पादन मिळाले आहे. एवढे विक्रमी उत्पन्न घेतलेल्या नागेश यांची संपूर्ण पंचक्रोशीत चर्चा होत आहे. शिवाय केळीत झेंडूसारखे आंतरपीक घेण्याच्या त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे सुद्धा त्यांच्या नावाची गावागावात चर्चा आहे.
कशी केली लागवड आणि खतांचे नियोजन :-
चोपडे यांनी सांगितले की, केळीसाठी शेत तयार करत असताना त्यांनी चार ट्रॉली शेणखत तर 150 पोती कोंबडखताचा वापर केला. तर जी 1 या जातीच्या रोपांची 6 X 5 अंतरावर लागवड केली.
यावेळी त्यांनी एनपीके खतांचा वापर तर केलाच पण त्याचबरोबरच सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचा देखील वेळोवेळी वापर केल्यामुळे पिकाची वाढ जोमदार होऊन त्यांना अन्नद्रव्यांची कमतरता भासली नाही. मिकनेल्क टॉनिक 32 च्या वापरामुळे मुळे पानातील अंतर वाढून त्याचा फायदा वादीची लांबी वाढण्यासाठी झाला.
आधुनिक सिंचन पद्धतीचा केला वापर :-
नागेश यांनी आपली केळीची बाग फुलवण्यासाठी सिंचनपद्धतीमध्ये ठिबक सिंचनाचा वापर केला. ड्रिपच्या साहाय्याने खतांचा योग्य वापर करता येतो, आयडियलच्या ‘बनाना बूम’ या उत्पादनाचा वापर केल्याने खतांचे चांगल्या प्रकारे विघटन होऊन झाडांची वाढ सुदृढ व निरोगी झाली.
त्याचबरोबर केळीची वेण तयार होत असताना पुन्हा एकदा आयडियलच्या ‘बनाना बूम’ या टॉनिकचा वापर केला, यामुळे वादीची लांबी, घडाचे वजन व केळी फणीतील अंतर यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली.
घडांचे वजन 55 ते 60 किलोंच्या दरम्यान वाढल्याने झाडे वाकून पडू नये म्हणून झाडांना आधार देण्यासाठी मेडीची चौरस बांधनी केल्याने ऐन पावसातही झाडांची पडझड झाली नाही.
दीड एकर क्षेत्रात केळीचे 55 टन उत्पादन मिळून सरासरी 23 ते 24 रुपये दर मिळाला आहे. याचा हिशोब केला तर केळीपासून 13 लाखांचे, तर 10 टन झेंडूपासून 2.5 लाखांचे उत्पन्न आजपर्यंत मिळाले आहे. याकामी होडशीळ ॲग्रो सर्व्हिसेसचे नितीन होडशीळ व आयडियलचे सेल्स आफिसर सुशांत भोसले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे नागेश यांनी सांगितले.