समृद्धीवर लालपरी सुस्साट ! शिर्डी – औरंगाबाद – जालना आगाराच्या बस 5 तासांत गाठणार नागपूर, पहा, वेळापत्रक अन् टिकट दर..
एसटी बसचा प्रवास म्हटलं की, आवाज करणारी गाडी, प्रत्येक ठिकाणी थांबा आणि संथ गतीने चालणारा प्रवास, असेच अनेकांना वाटते. मात्र, एस.टी.ने आता कात टाकण्याचे ठरवले आहे. लवकरच एस. टी महामंडळातर्फे 15 डिसेंबरपासून समृद्धी महामार्गावरून औरंगाबाद-नागपूर ही शयन आसनी बससेवा सुरू केली आहे.
यामुळे एसटी प्रवासाचा अनुभव तर बदलणार आहेच. शिवाय या बससेवेमुळे प्रवास अंतरात 50.9 किमी. ने कमी होणार असून औरंगाबादहून नागपूरला नेहमीपेक्षा 5 तास आधीच पोहोचता येणार आहे.
नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाची निर्मितीच मुळात नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देश्याने केली गेली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आलं आहे. त्यामुळे हा मार्ग नागरिकांच्या प्रवासासाठी उपलब्ध असून यावर आता वाहतूक देखील सुरु झाली आहे.
प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एस. टी. महामंडळाकडून औरंगाबाद ते नागपूर (मार्गे जालना) ही बससेवा समृद्धी महामार्गावरून 15 डिसेंबरपासून सुरू करण्यात येत आहे. या बसमध्ये प्रवाशांना टू बाय वन पद्धतीची 30 आसने (पुशबॅक) बसण्यासाठी उपलब्ध असून, 15 शयन आसने आहेत.
ही बस नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 10 वाजता सुटेल. तर जालना मार्गे पहाटे 5.30 वाजता पोहोचेल. प्रवाशांच्या प्रवास अंतरात 50.9 किलोमीटर व प्रवास वेळेमध्ये 4.40 तास इतकी बचत होईल. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार आहे.
तर दुसरीकडे नागपूर – शिर्डी हे बस नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 9 वाजता सुटेल. पहाटे 5.30 वाजता नागपूर ते जालना या गंतव्य ठिकाणी पोहोचेल, बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात 102.5 किलोमीटर व वेळेमध्ये 4.15 तासांची बचत होईल.
किती असणार तिकीट ?
नागपूर ते शिर्डी प्रवासात प्रौढ व्यक्तींसाठी 1300 रुपये इतके तिकीट असणार आहे, तर मुलांसाठी 670 रुपये व 65 ते 75 दरम्यानच्या ज्येष्ठांना 50 टक्के सवलत असणार आहे. शासनाच्या योजनेनुसार 75 वर्षावरील ज्येष्ठांना 100 टक्के मोफत, प्रवास असणार आहे.
नागपूर ते औरंगाबाद प्रवासासाठी असे राहणार तिकीट
प्रौढ व्यक्ती 1100 रुपये
मुलांसाठी 575 रुपये
नागपूर ते जालना प्रवासासाठी असे राहणार तिकीट
प्रौढ व्यक्ती 945 रुपये
मुलांसाठी 505 रुपये
ट्रॅव्हल्स ने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागणार ?
समृद्धी महामार्गावरून ट्रॅव्हल्सही धावणार आहेत. ट्रॅव्हल्सने नागपूरचा प्रवास कमी वेळेत होणार आहे. मात्र, टोलमुळे औरंगाबाद-नागपूर ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार हे नक्की.
औरंगाबादहून नागपूरसाठी ट्रॅव्हल्सचे भाडे साधारण अकराशे ते बाराशे रुपये आहे. समृद्धी महामार्गावरून ट्रॅव्हल्स धावल्याने प्रवास भाड्यात कमीत कमी शंभर रुपयांपर्यंत भाडेवाढ होईल. असे औरंगाबाद बस ओनर्स असोसिएशनचे सचिव मोहन अमृतकर म्हणाले.