सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा पाहायला मिळत आहे. शेती व्यवसायामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतीत नवे प्रयोग करणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेशीम शेतीच्या माध्यामातून औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणास नवी उंची देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे या जिल्हाधिकाऱ्यांची राज्यभर चर्चा रंगली आहे.
या प्रकल्पाअंतर्गत तालुक्यात तब्बल 1 हजार 400 एकर वर तुती लागवडीचे नियोजन हाती घेण्यात आले असून, जिल्हा रेशीम कार्यालयाकडून यातील 250 प्रस्तावांना तांत्रिक मान्यताही देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील बहुतांश भाग हा पूर्णतः मोसमी पावसावर निर्भर असल्याने या भागात शेती करणे म्हणजे जोखमीचे काम आहे. या भागात पावसाची विसंगती कायमच अनुभवायला मिळते.
यात पुन्हा विविध रोगांचा प्रादुर्भाव बाजारातील अस्थिर दर अश्या गोष्टींचा ससेमिरा पाठीशी असतोच, शिवाय शाश्वत जलसिंचनासाठी ना कोणत्या तलावाचे,ना कालव्याचे पाणी उपलब्ध आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे जीवन अधिकच खडतर बनत चालले आहे.
अश्या स्थितीत कमी पाण्यात आणि कमी खर्चात हमखास उत्पन्न देणारी रेशीम शेती हा एक उत्तम पर्याय असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे मत आहे. त्यांनी जिल्ह्यात आगामी 2023-24 या वर्षात 10 हजार एकर क्षेत्रावर रेशीम शेती उभी करून, जिल्ह्यातील दहा हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. एवढेच नाही तर त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.
हे योजना यशस्वीरीत्या राबवता यावी यासाठी यासाठी तालुका आणि गावस्तरावर नियोजन करून पंचायत समिती, कृषी व महसूल यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
यासाठीचे गावनिहाय प्रस्ताव जिल्हा रेशीम कार्यालयात सादर करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा रेशीम कार्यालयाच्या अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येत आहे.
1400 एकरात फुलणार तुती
कळंब तालुक्यात एकूण 1 हजार 400 एकरात तुती लागवडीचे नियोजन जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी दिले आहे. यातील 700 एकरवर जूनमध्ये तर 700 एकरमध्ये सप्टेंबरला लागवड केली जाणार आहे.
रेशीम कोषाला मिळतोय उच्चांकी दर..
मागच्या काही दिवसांपासून रेशीम कोषाला उच्चांकी दर मिळत आहे. सध्या तर 600 ते 725 दरम्यान भाव मिळाल्याने या शेतीला अधिकच डिमांड प्राप्त झाले आहे.
250 प्रस्तावांना तांत्रिक मान्यता
रेशीमचे तांत्रिक सहायक पी.व्ही. इंगळे यांनी सांगितले की कळंब तालुक्यातून देवधानोरा, जवळा, मस्सा, कन्हेरवाडी, निपाणी आदी गावांतून आजवर 910 प्रस्ताव मिळालेले आहेत. यापैकी 250 प्रस्तावांना जिल्हा रेशीम अधिकारी आरती वाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक मान्यता देण्यात आली असून त्यापैकी 123 प्रस्ताव कळंब तहसीलदार यांच्याकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर झाले आहेत.
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा होणार फायदा..
शेतकऱ्यांना यासाठी एक एकरला कुशल स्वरुपात 1 लाख 13 हजार तर अकुशल स्वरुपात 2 लाख 29 हजार असे एकूण 3 लाख 42 हजार रुपयांचे जवळजवळ 3 वर्षांसाठी महाग्रारोहयोचे अर्थसहाय्य मिळणार आहे. मिळणाऱ्या उत्पन्नासाठी मार्केटचेही नियोजन सुरू आहे. कर्नाटकच्या रामनगरला पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून जालना, बीड, लातूर बाजार समिती, सोलापूरचे हिरज फार्म, लगतचे मुरुड असे मार्केटचे पर्याय उपलब्ध केले जाणार आहेत.