Farmer Success Story : खरेतर केळीला गोरगरिबांचे फळ म्हटले जाते. केळीचे उत्पादन घेण्यात महाराष्ट्र संपूर्ण देशात आघाडीवर आहे. असे असले तरी मात्र रेड बनाना म्हणजेच लाल केळी आणि वेलची केळी या दोन प्रकारात देशात तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांची मक्तेदारी आहे.

परंतु आता ही स्थिती जास्त काळ राहणार नाही, कारण करमाळा तालुक्यातील एका तरुण इंजिनियर शेतकऱ्याने या दोन्ही प्रकारच्या केळीचे यशस्वी उत्पादन घेत देशभरातील व्यापाऱ्यांना आपल्या बांधावर येण्यास भाग पाडले आहे.

आयुर्वेदामध्ये लाल रंगाची केळी अतिशय औषधी आणि गुणकारी म्हणून ओळखली जाते. यामुळे उच्चभ्रू वर्गात या केळींना फार मोठी मागणी असते. अभिजीत पाटील या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतातील G9 म्हणजे नेहमीची केळी विक्रीला नेल्यावर तिथे लाल केळी आणि इलायची केळी पाह्यला मिळाली. याची चौकशी केल्यानंतर अभिजीतची जिज्ञासा जागी झाली आणि त्याने याबाबत अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली.

मोठमोठ्या शहरातील फाईव्ह आणि सेव्हन स्टार हॉटेल्स , रिलायन्स, बिग बास्केट, टाटा यासारख्या मोठ्या मॉलमध्ये या केळीची 120 रुपये किलो दराने विक्री होत असल्याचे त्याला समजले. मात्र या प्रकारची केळी फक्त तामिळनाडू आणि कर्नाटकमधील काही भागातच पिकतात, असंही त्याला समजले मात्र तरीसुद्धा अभिजीतने ही केळी करमाळा तालुक्यातील वाशिंबे इथल्या आपल्या शेतात लावण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी देखील करून दाखवला.

इलायची केळीच्या माध्यमातून लाखोंची कमाई..

अभिजीत पाटील यांची उजनी जलाशयाच्या काठावर शेती असून गेल्या अनेक वर्षांपासून इथे ऊसाचे पीक घेतले जात होते. स्थानिक राजकारणामुळे ऊस गाळपाला अडचण येऊ लागल्याने अभिजितच्या वडिलांनी 2005 मध्ये पहिल्यांदा या भागात G9 या नेहमीच्या केळीची लागवड केली. पुढे या केळींचे कधी दर 20 रुपये तर कधी थेट 2 रुपये असे बदलत असल्याने कधी फायदा तर कधी तोटा होऊ लागला होता. यानंतर अभिजीतने पहिल्यांदा 2015 साली वेलची केळी लावण्याचा निर्णय घेतला आणि 7 एकरवर या केळीची लागवड केली.

वेलची केळीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने असून ही केळी अनेक विकारांवर गुणकारी असल्याचे मानतात. हिरवी रंगाची आणि केवळ 2 ते 3 इंच लांबी आणि आकाराने गोलसर असणाऱ्या वेलची केळीची चव अगदी पेढ्याप्रमाणे आहे. खात म्हणून गीर गायीचे शेण, गोमूत्र आणि ऊसाच्या मळीची स्लरी देत त्यांनी बागेची जोपासना केली.

दहाव्या महिन्यात अभिजीतला एकरी 12 ते 15 टन इलायची केळीचे उत्पन्न मिळाले. या केळीला 50 रुपये किलोप्रमाणे दर मिळाल्याने त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळाले. यानंतर अभिजीतने या वेलची केळीची तब्बल 30 एकरात लागवड केली आणि आता दर दहा महिन्यांनी दीड कोटींपेक्षा अधिक उत्पन्न त्यांना मिळू लागले आहे.

लाल केळीचे फायदे..

वेलची केळीच्या यशस्वी उत्पादनानंतर 2019 मध्ये अभिजीतने 3 एकर शेतात पहिल्यांदाच लाल केळीची लागवड केली. या लाल केळ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यात पोटॅशियम मोठ्या प्रमाणात तर सोडियम कमी प्रमाणात असते. आपल्या या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे ही केळी ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त मनाली जाते.

कॅन्सर, हृदय विकार, मधुमेह, डोळ्यांचे विकार हे आजार दूर ठेवण्यासाठी रोज दोन लाल केळी खाणे अतिशय फायदेशीर असल्याचं मानलं जातं. याशिवाय पचनसंस्था परिणामकारकरीत्या चालवण्याचे कामही या लाल केळ्यांमुळे सुकर होते. त्यामुळेच या केळ्यांना उच्चभ्रू वर्गात फार मोठी मागणी आहे.

अभिजित यांनी रासायनिक खते आणि औषधांना फाटा देत संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने जोपासना केल्याने 14 महिन्यात त्यांना एकरी 18 ते 20 टन एवढा माल मिळाला. या केळींना देखील प्रतिकिलो 50 ते 75 प्रमाणे भाव मिळत असल्याने महाराष्ट्रात केलेले हे दोन्ही प्रयोग यशस्वी झाले आहेत. लाल केळीच्या झाडांना 15 ते 20 फुटांपर्यंत वाढ असते. त्यामुळे सुरुवातीला अभिजीतलाही हे थोडे त्रासदायक वाटले.

शिवाय या केळीच्या झाडाला मोठ्या प्रमाणात पिल्ले येत असल्याने बाकीची पिल्ले वेळीच तोडण्याची खबरदारी घ्यावी लागते. असे अभिजीतचे वडील बाळासाहेब पाटील सांगतात. सध्या अभिजीतची शेती पाहून वाशिंबे परिसरात 500 एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर वेलची केळी आणि लाल केळीची लागवड झाली आहे.

आता वाशिंबे हे महाराष्ट्रातील वेलची केळी आणि रेड बनानाचे हब बनू लागले आहे. विशेष म्हणजे ही केळी पाहण्यासाठी सध्या जळगाव, नाशिक, औरंगाबादसह राज्यातील विविध भागातून शेतकरी येत असून जवळपास 70 लाख बेण्यांची विक्री झाल्याचे बाळासाहेब पाटील सांगतात.

सिव्हिल इंजिनिअरिंग अभिजीतचे शेतात प्रयोग

सिव्हिल इंजिनियरिंग केलेल्या अभिजीतने आपल्या शेतात वडिलांच्या जोडीने नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि महाराष्ट्रातील लाल केळी आणि इलायची केळीचा पहिला प्रयोग यशस्वी करुन दाखवला. केळीशिवाय आज अभिजीतकडे 8 एकर गोल्डन सीताफळाची बाग असून यातूनही तो एकरी 5 लाख रुपयांचे उत्पन्न घेतो.

सीताफळांसोबत अभिजीतने व्हाईट ड्रॅगन आणि रेड ड्रॅगनची लागवड केली असून यातूनही अभिजीतला एकरी 10 लाखापर्यंत उत्पन्न मिळत आहे. सध्या अभिजीत केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोल मॉडेल बनला असून राज्यभरातून रोज शेकडो शेतकरी त्याची शेती पाहण्यासाठी येत असतात.

आजही अभिजित रेड बनाना असो वेलची केळी असो अथवा गोल्डन सीताफळ असो या सर्वांचे स्वतःच पॅकिंग करुन मार्केट मध्ये पाठवत असतात. देशभरातील 5 स्टार हॉटेल आणि मॉलमधून येणाऱ्या ऑर्डरप्रमाणे माल पॅकिंग करुन ते पाठवत असतात.

अभिजीतच्या या प्रयोगामुळे केळीच्या प्रकारातील तामिळनाडू आणि कर्नाटकाची मोनोपॉली संपुष्टात आली आहे. आज त्याच्या बांधावर बड्याबड्या मल्टिनॅशनल कंपनीच्या टीम रेड बनाना आणि वेलची बनाना खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *