नांदेडमधील एका अभियंता पती – पत्नीने लाखो रुपयांची नोकरी सोडून शेतीची वाट धरली. आता या दाम्पत्यानी शेतीतून मोठ उत्पन्न मिळवत आहेत. अनेकजण नोकरी सोडून आता शेतीकडे वळत असल्याचे चित्र आहे. अनेक शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करून लाखो रुपये उत्पन्न मिळवित आहेत.
नांदेडच्या उच्च शिक्षित आणि आयटी इंजिनियर असलेल्या एका दाम्पत्याने लाखो रुपये पगार असलेली नोकरी सोडून शेतीची वाट घरली आहे. या उच्चशिक्षित पती – पत्नीने शेवग्याच्या पाल्यापासून नवीन आणि वेगळा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायातून हे दाम्पत्य महिन्याला लाखो रुपयाचे उत्पन्न मिळवत आहेत.
मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे असे या पती – पत्नीचे नाव आहे. शहराजवळ असलेल्या पावडेवाडी येथील रहिवासी मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे हे आयटी क्षेत्रातील इंजिनियर आहेत. पुणे आणि हैद्राबादसारख्या मेट्रो शहरात त्यांनी जवळपास 15 वर्ष अनेक मोठया कंपनीत नोकरी केली.
मंजुषा पावडे यांना महिन्याला 1 लाख 20 हजार, तर त्यांचे पती गुलाब पावडे यांना जवळपास 2 लाख रुपये इतके पॅकेज मिळायचे. पण शेतीतून, शेतीच्या माध्यमातून वेगळे काही सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते. हैदराबाद येथे वास्तव्यास असताना त्यांनी शेवग्याच्या शेतीची माहिती घेण्यास सुरुवात केली. शेवग्याच्या शेंगा आणि त्याच्या पाल्याचे काय गुणधर्म आहेत, त्याची लागवड कशी करावी, त्यातून किती उत्पन्न मिळेल याची संपूर्ण माहिती दोघांनी जाणून घेतली.
लाखो रुपयांची नोकरी सोडली..
2018 साली या पती – पत्नीने नोकरी सोडली आणि आपल्या गावी परतले. स्वतःच्या दहा एकर शेतीमध्ये कुठलंच पीक न घेता शेतात शेवग्याची लागवड केली. दोन ओळीत नऊ फूट अंतरावर शेवग्याची रोपं लावली. सुरुवातीला शेवग्याच्या शेंगांचा त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. मात्र त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी शेवग्याच्या पाल्यापासून पावडर निर्मिती करण्यास सुरुवात केली.
ही पावडर मोरिंग्या पावडर म्हणून ओळखली जाते. मधुमेहासाठी ही पावडर अत्यंत गुणकारी आणि रामबाण उपाय असल्याचे सांगितले जाते. या पावडरची 1 हजार रुपये प्रति किलो दराने विक्री होत असून पावडे दाम्पत्यांला महिन्याला तीन लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.
कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय मंजुषा पावडे आणि गुलाब पावडे यशस्वीरित्या सांभाळत आहेत. या पावडरला पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठी मागणी असून डॉक्टर आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात पावडर खरेदी करत असल्याची माहिती पावडे दाम्पत्यांनी दिली. त्यांच्या या यशस्वी प्रयोगाचं कौतुक होतं आहे.
पावडर तयार करण्याची प्रक्रिया..
शेवग्याच्या रोपांची लागवड केल्यानंतर तीन महिन्यानंतर पाला उपलब्ध होतो. त्यानंतर पाला तोडून, तो एकत्र करून भिजत घालतात. निजंतुकीकरण करण्यासाठी लिंबाची पानं आणि मीठ देखील टाकलं जातं.
त्यानंतर दोन ते तीन दिवस पाला सुकण्यासाठी ठेवला जातो. पाला पूर्ण सुकल्यानंतर मशीनमधून बारीक करून पावडर तयार केली जाते. त्यानंतर पाव किलो, अर्धा किली आणि एक किलोप्रमाणे पॅकिंग करुन ऑर्डरप्रमाणे विक्री केली जाते.