शेतीशिवार टीम, 7 डिसेंबर 2021 : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात महिला अत्याचार आणि गुन्हेगारीविषयक घटना सातत्याने घडताना दिसून येत आहे. एका विधीसंघर्ष मुलाने सख्ख्या 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली आहे.
बर्थडे’ पार्टीला बोलावून तरुणीला पुण्यातील तळजाईच्या जंगलात नेऊन तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. शुभम सिताराम शिंदे (वय 19, रा. सह्याद्रीनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी कात्रज येथील एका 22 वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी शुभम याने फिर्यादी तरुणीला 5 डिसेबर रोजी वाढदिवसाची पार्टी आहे, तु तळजाई शेवटचा बसस्टॉप येथे ये असे सांगितले.
त्याप्रमाणे ती आली असताना आरोपीने त्याचा त्याच्या मित्रासह फिर्यादी यांना सायंकाळी 5 वाजता तळजाई येथील जंगलात नेले. तेथे ते दोन अडीच तास दारु पित बसले होते. फिर्यादी तरुणीला थंडी जाणवल्यानं तिला तिथंच कडेला झोपवलं. आणि शुभम याने तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेची माहिती तिने सहकारनगर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी शुभम याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देसाई तपास करीत आहेत.