शेतीशिवार टीम : 6 जुलै 2022 : अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय लष्करात 1 जुलैपासून रजिस्ट्रेशन सुरू झालं असून राज्यवार अग्निपथ भरती रॅलीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या तारखा joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही पाहू शकता.पहिल्या टप्प्यात 25,000 अग्निवीर सैन्यात भरती होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे
राज्यात अग्निपथ योजनेअंतर्गत पुणे, बीड, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
अहमदनगरमधील जिल्ह्यातील राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठात अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/ स्टोअर कीपर टेक्नॉलॉजी आणि अग्निवीर ट्रेडसमन या पदांसाठी ही रॅली होणार असल्याचं संरक्षण पत्रकात म्हटलं आहे.
23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ही रॅली काढण्यात येणार असून रिलीझमध्ये म्हटले आहे की, उमेदवारांनी रजिस्ट्रेशन आणि ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे, ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेश पत्र त्यांच्या रजिस्टर्ड email ID वर पोस्ट करण्यात येणार आहे.
भरती मेळाव्यात सहभागी झालेले उमेदवार अग्निपथ भरती योजनेद्वारे शासित असतील आणि चार वर्षांच्या कालावधीसाठी असतील. संभाव्य उमेदवारांची नियोजित 20 दिवसांमध्ये जिल्हा आणि तहसीलनिहाय तपासणी केली जाणार असल्याचं पत्रकात म्हटलं आहे.
या योजनेत सहभागी उमेदवारांची बायोमेट्रिकली पडताळणी केली जाणार असून उमेदवारांना शारीरिक चाचण्या, वैद्यकीय चाचण्या आणि सामायिक प्रवेश परीक्षा (written exam) यांचा समावेश असलेल्या प्रत्यक्ष निवड चाचणींना परवानगी देण्यापूर्वी रॅलीसाठी प्रवेशपत्रे स्कॅन केली जाणार असल्याचं पत्रकात म्हटलं आहे.
अग्निपथ योजनेअंतर्गत होणारे फायदे…
4 वर्षांत 24 लाख 24 हजार पगार तसेच निवृत्तीवेतनासह मिळणार अनेक फायदे…
प्रत्येकी 4 वर्षांसाठी युवकांची लष्करासह तिन्ही सैन्यदलांत भरती केली जाणार…
दर वर्षी किमान 46 हजार तरुणांची लष्कर भरती केली जाणार
चार वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर योजनेतील 75% सैनिकांना सेवामुक्त केलं जाणार मात्र, पुढील काळात सशस्त्र दलांतील विविध भरतीसाठी त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे.
25% तरुणांना सैन्यदलांत पुढे सेवेची संधी मिळेल. मात्र जेव्हा सैन्यभरती होईल तेव्हाच या 25% युवकांना पात्रता निकष पूर्ण केल्यावर सेनेत सामावून घेतले जाईल.
सैनिकांना वेतन पुढीलप्रमाणे मिळेल –
पहिले वर्ष – 3 लाख 60 हजार रुपये वार्षिक ( हाती येतील – 2 लाख 52 हजार ) / प्रतिमहिना – 30 हजार रुपये ( हाती येतील – 21 हजार रुपये )
दुसरे वर्ष – 3 लाख 96 हजार रुपये वार्षिक (हाती येतील – 2 लाख 77 हजार 200) / प्रतिमहिना – 33 हजार रुपये ( हाती येतील – 23 हजार 100 रुपये )
तिसरे वर्ष – 4 लाख 32 हजार रुपये वार्षिक (हाती येतील – 3 लाख 6 हजार 960) / प्रतिमहिना – 36 हजार रुपये ( हाती येतील – 25 हजार 580 रुपये )
चौथे वर्ष – 4 लाख 80 हजार रुपये वार्षिक (हाती येतील – 3 लाख 36 हजार ) / प्रतिमहिना – 40 हजार रुपये (हाती येतील – 28 हजार रुपये)