अहमदनगर-माळशेज घाट-कल्याण चौपदरीकरण ; भूसंपादन लवकरच होणार सुरु, बोगद्यासाठी 2478 कोटी तर 4 -वे साठी 1200 कोटींचा निधी !

0

कल्याण – मुरबाडमार्गे माळशेज घाट रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. यावेळी मुरबाडचे भाजपचे आमदार किसन कथोरे उपस्थित होते. 

माळशेज घाटातील बोगद्यासाठी सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता दिल्याने व या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर हा महामार्ग सुसाट होणार असून, मुंबई, पुणे, कोकणासह मराठवाड्याच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरणार आहे. कल्याण – मुरबाडमार्गे माळशेज रस्ता हा दुपदरी आहे. हा रस्ता चौपदरी झाल्यास अधिक प्रशस्त होईल.

सध्या या महामार्गावरून जुन्नर, आळेफाटा, नगर, औरंगाबाद व पुणे इ. भागातील शेतकरी व व्यापारी आपला माल कल्याण, मुंबईच्या बाजारपेठेत आणतात. त्याचप्रमाण या भागातून व्यापारी व औद्योगिक क्षेत्रातील मालाचीही ने – आण होत असते. रोज अनेक बसेस, खासगी व व्यापारी वाहने महामार्गावरून वाहतूक करतात.

त्यामुळे हा महामार्ग मुंबई, कोकण व पुणे आणि मराठवाड्याला जोडणारा एक महत्त्वाचा महामार्ग आहे. अरुंद रस्त्यामुळे अनेक वाहने पुणेमार्गे मुंबई येथे दूरचा प्रवास करून जातात. हा महामार्ग चौपदरी झाल्यास दळणवळणाची क्रांती या भागात होईल. त्याचप्रमाणे पावसाळ्यात माळशेज घाटात अनेकदा दरडी कोसळून महामार्ग बंद होतो.

तसेच वाहनचालकांना महामार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. याकरिता आ. किसन कथोरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन व अत्यावश्यक गरज ओळखून गडकरी यांनी महामार्गाच्या चौपदरीकरणास तत्त्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकर सुरू होणार आहे.

महामार्गाच्या चौपदरीकरणास 1200 कोटी रुपये खर्च येणार आहे. कल्याण वरप – कांबामार्गे मुरबाड – माळशेज घाट हा रस्ता चौपदरी करण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावेत, अशा स्पष्ट सूचना यावेळी मंत्री गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

माळशेज घाटात पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना होतात. परिणामी माळशेज घाटातील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे कल्याण – नगरचा संपर्क तुटतो. माळशेज घाटाच्या पायथ्यापासून मढपर्यंत घाटात एक बोगदा मार्ग तयार केला जावा, अशी मागणी आ. कथोरे यांनी केली. त्यांच्या या मागणीचा विचार केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केला आहे .

घाटात बोगदा खोदण्यासाठी 2 हजार 478 कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरीचे आदेश गडकरींनी दिले आहेत.

कल्याण – मुरबाडमार्ग माळशेज या रस्त्यावर शहाड येथे रेल्वे उड्डाणपूल आहे. रस्त्याचे चौपदरीकरण केले जात असताना या पुलाचे रुंदीकरण करण्यासही तत्वतः मंजुरी दिली आहे. याशिवाय शीळफाटा – एरजाड म्हसा धसईमार्गे माळशेज घाट या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा, माळशेज घाटात बहुचर्चित जगातील चीननंतरचा दुसरा असा पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काचेचा स्कायवॉक व गार्डन वाचण्यासाठीचा विकास आराखडा तयार करण्याचा निर्णय या समेत घेण्यात आला.

खडवली व वागणी येथे मान्यता मिळालेल्या रेल्वे ओव्हरब्रिजचे काम लवकर काम सुरू करण्याचेही त्यांनी सांगितले. कर्जत – कसारा या नवीन रेल्वे लाइनच्या मागणीसंदर्भात लवकरात लवकर हे करून अहवाल सादर करण्याचे आश्वासनही दिले आहे.

पत्रकार :- संतोष गायकर (दैनिक पुण्यनगरी)

Leave A Reply

Your email address will not be published.