पुरंदर तालुक्याच्या दिवेमधील जाधववाडीचे शेतकरी अतुल रामचंद्र जाधव यांनी पेरूच्या अवघ्या साडेसहाशे झाडांपासून वार्षिक तब्बल 16 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. जाधव हे परिसरातील प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. अतुल जाधव यांनी उत्पादित केलेला पेरू हा मुंबईत विक्रीला पाठवतात. त्याठिकाणी उच्च प्रतिचा पेरू असल्याने त्यांच्या पेरूला विक्रमी भाव मिळतो. मुंबईतील व्यापारी हे जाधव यांच्या शेतातील पेरू खरेदी करून पुन्हा त्याची प्रतवारी करतात.
एका क्रेटमध्ये जवळपास 20 किलो पेरू असतो, त्यातील 15 किलो पेरू हा निर्यातीसाठी व्यापारी पाठवतात. जाधव यांच्याकडे सध्या पेरूची एकूण 1100 ते 1200 झाडे आहेत. त्यातील 325 झाडे ही रत्नदीप जातीची आहेत, त्यातून त्यांना तब्बल 12 लाख रुपयाच तर सरदार जातीच्या झाडांपासून 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, तर 430 झाडे ही लहान असल्यामुळे त्यांचे उत्पादन सुरू झालेले नाही.
रत्नदीप जातीचा पेरू हा वरून पोपटी आणि आतून लाल असतो, तर त्याची गोडी ही इतर सर्व प्रकारच्या पेरूंपेक्षा जास्त आहे. रत्नदीप जातीची झाडे ही सध्या सहा वर्षांची आहेत. 18 महिन्यांची असताना पहिला भार धरला होता. त्यावेळी अवघे अर्धा ते पाऊण क्रेट पेरूंचे उत्पादन मिळाले. त्यानंतर उत्पादन हळूहळू वाढत गेले. सद्य:स्थितीत उत्पादनात वाढ झाली आहे.
जाधव हे पेरूंच्या झाडांना सुकलेले शेणखत वापरतात. ते रासायनिक खतांचा कसल्याही प्रकारचा वापर करत नाहीत. तर लिंबोळी पेंड व इतर सेंद्रीय खतेही वापरतात. ते झाडांची निगा काटेकोरपणे करतात. त्यामध्ये कसल्याही प्रकारची कमतरता न ठेवता प्रत्येक झाडाकडे बारकारईने लक्ष दिले जाते. ते पेरूच्या एका झाडापासून तब्बल 7 क्रेट इतके उत्पादन घेतात. एका क्रेटमध्ये 20 किलो पेरू असतात, तर एका झाडापासून एकूण 140 किलो उत्पादन घेतात.
पेरूला प्रतिक्रेटला तब्बल 700 ते 1200 रुपयांचा भाव मिळतो. पेरूची लागवड केल्यानंतर बाग ही तब्बल 20 ते 25 वर्षे सुरू राहते. ऑगस्ट ते फेब्रुवारीदरम्यान हंगाम असतो. जाधव कुटुंबाची ओळख पुरंदर तालुक्यातील दिवे परिसरात शेतीत अभिनव प्रयोग करणारे कुटुंब अशी आहे. अतुल जाधव यांना दोन भाऊ असून त्यांचे एकत्र कुटुंब आहे. वडिलांचे निधन झाले आहे. वडील कै. रामचंद्र आणि आई रखमा या दोघांचा शेतीचा वारसा अतुल यांनी पुढे चालवला आहे.
शेताच्या जोरावर त्यांनी कुटुंबाची प्रगती साधली असून गोडावूनदेखील त्यांनी बांधले आहे. अतुल जाधव यांचा पुतण्या बीएसस्सी झाला असून आता तो प्रक्रिया उद्योगात लक्ष केंद्रीत करू लागला आहे. प्रक्रिया उद्योगाची सुरुवातही त्यांनी केली असून सीताफळ, चिक्कू, स्ट्रॉबेरी, आंबा, जांभूळ या फळांचा पल्प (गर) काढतात.
त्यांची सुरुवातीच्या काळात अंजिराची शेती होती… अंजिराच्या शेतीमध्येही चांगल्या प्रकारचे उत्पादन घेतले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी अंजिराची शेती कमी केली असून आता त्यांनी सद्य:स्थितीत पेरूच्या उत्पादनावर भर दिला आहे. भविष्यातही शेतीत विविध प्रयोग राबविण्याचा त्यांचा मानस आहे.
अतुल जाधव म्हणाले की,
आमचा मुख्य व्यवसाय हा शेती असून त्यामध्ये आमचे संपूर्ण कुटुंब मेहनत करते. शेतीची आवड असल्याने त्यामध्ये विविध प्रकारचे प्रयोग कायमच राबवित आहोत. शेतीच्या विविध पिकांचा अभ्यास करून शेती केल्यास नक्कीच फायदा होतो . – अतुल जाधव , पेरू उत्पादक शेतकरी , दिवे, ता. पुरंदर
गणेश वाघमोडे