Aurangabad Metro : शेंद्रा-रेल्वेस्टेशन मेट्रोला मनपाचा हिरवा कंदील, वाळूज-शेंद्रा 24Km चा उड्डाणपूल होणार, पहा असा असणार मार्ग..
शेंद्रा ते रेल्वेस्टेशनपर्यंतच्या मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी महानगरपालिकेने अनुकूलता दाखवली आहे. या कामाच्या डीपीआरचे सादरीकरण मार्च महिन्यात मंत्र्यांसमोर करण्यात येणार आहे. रेल्वेस्टेशन ते हर्सल टी पॉइंटपर्यंतच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामात काही ठिकाणी अडथळे असल्यामुळे तूर्त या टप्प्यातील कामावर विचार केला जाणार नाही, असे संकेत महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.
औरंगाबाद शहरात मेट्रो रेल्वे सुरू व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मेट्रोचा आराखडा तयार करण्यापूर्वी कॉम्प्रेसिव्ह मोबॅलिटी प्लान तयार करावा लागतो. यातून वाहनांची संख्या, ज्या मार्गावर मेट्रोचे काम करण्यात येणार आहे. त्या मार्गावर होणारी वाहनांची ये जा आदी बाबी स्पष्ट होतात. तयार करण्यात आलेल्या कॉम्प्रेसिव्ह मोबॅलिटी प्लानचे सादरीकरण तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर महामेट्रो यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी केले होते.
त्यानंतर शुक्रवारी (दि.10) मेट्रो रेल्वे आणि वाळूज ते शेंद्र्यापर्यंत अखंड उड्डाणपुलाच्या DPR चे सादरीकरण महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या समोर केले. या सादरीकरणानंतर डॉ. चौधरी यांनी पत्रकारांना माहिती दिली.
डॉ. चौधरी म्हणाले, दोन टप्प्यात मेट्रोचे काम करण्यात येणार आहे. पहिला टप्पा शेंद्रा ते रेल्वेस्टेशन असा असेल. शेंद्रा – चिकलठाणा – सिडको बसस्थानक चौक – क्रांती चौक – उस्मानपुरा रेल्वेस्टेशन असा असेल तर दुसऱ्या टप्प्यात रेल्वेस्टेशन ते हर्सल टी पॉइंट असे काम करण्याचे नियोजन आहे.
रेल्वेस्टेशन – महावीर चौक – मध्यवर्ती बसस्थानक – ज्युब्लीपार्क – रंगीन गेट – जिल्हाधिकारी कार्यालय – दिल्ली गेट हर्सल टी पॉइंट असा मार्ग असणार आहे . दुसऱ्या टप्प्यातील मार्गात काही वारसास्थळे आहेत, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणाच्या जवळून मेट्रो जाणार आहे. त्यामुळे या मार्गात बरीच वळणे आहेत. शिवाय वारसा – स्थळांचादेखील प्रश्न आहे. त्यांना सुरक्षित ठेवून काम करावे लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याचा विचार तूर्त बाजूला ठेवून पहिल्या टप्प्यावर काम करण्यास अनुकुलता दाखवण्यात आली.
या कामाचा व्यवस्थित DPR (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याची सूचना महामेट्रोला करण्यात आली आहे. तो डीपीआर तयार झाल्यावर मार्च महिन्यात त्याचे सादरीकरण केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या समोर केले जाईल. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.
वाळूज – शेंद्रा अखंड उड्डाणपुलाचे काम प्राधिकरणाच्या माध्यमातून..
वाळूज औद्योगिक वसाहत आणि शेंद्रा औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या अखंड उड्डाणपुलाचा DPR (सविस्तर प्रकल्प अहवाल) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सादर केला जाणार आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून या उड्डाणपुलाचे काम केले जाणार आहे. अशी माहिती महानगर पालिकेचे प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि गतीमान वाहतूक करण्याच्या दृष्टीने वाळूज औद्योगिक वसाहत आणि शेंद्रा औद्योगिक वसाहत या दोन्हीही वसाहतींना जोडणारा सुमारे 24 किलोमीटर अंतराचा अखंड उड्डाणपुल तयार करण्याचे प्रस्तावित होते. त्यासाठी तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासमोर महामेट्रो या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरणदेखील केले होते. अखंड उड्डाणपुलाच्या कामाचा डीपीआर तयार करण्याचे काम महानगर पालिका आणि स्मार्ट सिटीने महामेट्रोला दिले.
छावणीतील लष्कराच्या जागेचा अडथळा..
डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, उड्डाणपुलाचा महामेट्रोने तयार केलेला DPR राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सादर केला जाणार आहे. उड्डाणपुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणार आहे. उड्डाणपुल बांधणीसाठीचा खर्च देखील प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जाणार आहे. अखंड उड्डाणपुलाचा DPR सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांचा असेल असा उल्लेख त्यांनी केला.
छावणीमधील लष्कराच्या जागेवरून उड्डाणपुल बांधणे शक्य होणार की नाही याची चाचपणी केली जात आहे. यासाठी लष्कराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे असे डॉ. चौधरी म्हणाले. उड्डाणपुलासाठी लष्कराच्या जागेचा अडथळा निर्माण झाला तर शेंद्रापासून निघालेला उड्डाणपुल नगरनाका येथे उतरवला जाईल आणि त्यापुढे तीसगावपासून पुन्हा उड्डाणपुल सुरू होईल असा एक पर्याय आहे असे संकेत त्यांनी दिले.