karjat Nagar Panchayat Election : सकाळी ज्या उमेदवारासाठी सुजय विखेंची सभा, संध्याकाळी त्याच्याच हाती घड्याळ…
महाअपडेट टीम,18 डिसेंबर 2021:- कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या चांगलाच संघर्ष पेटला असून कर्जत नगरपंचायतीसाठी दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
21 डिसेंबर रोजी कर्जत नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून राम शिंदेंना पुन्हा एकदा जोरदार धक्का दिला आहे.
प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खा.डॉ. सुजय विखे व माजी मंत्री राम शिंदे यांनी काल सकाळी कर्जत येथे भाजपच्या एका उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली. मात्र, ज्या उमेदवारासाठी सभा घेतली, त्याच उमेदवाराने संध्याकाळी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
झालं असं की, प्रभाग 14 चे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिबा तारेक सय्यद यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री राम शिंदे आणि खा. सुजय विखे पाटील यांची काॅर्नर सभा सकाळी 11 वाजता संपन्न झाली.आणि सुजय विखे यांनी पाठ फिरताच संध्याकाळी 5 वाजता सय्यद यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला.
रोहित पवारांच्या या खेळीने भाजपचे कार्यकर्ते चांगलेच संतापले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत माजी मंत्री राम शिंदेनी ट्विट करत कर्जत – जामखेड चे विद्यमान आमदार यांचे हेच विकासाचे राजकारण का ?, असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित करत रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.