महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्त्याचे (रिंग रोड) भूमिपूजन विधानसभा निवडणुकीपूर्वी होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागल्यानंतर या रस्त्याचे काम विनाअडथळा सुरू राहण्यासाठी त्यापूर्वीच भूमिपूजन करून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यानुसार प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.
पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ते महामंडळाकडून १७२ किलोमीटर आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. (Pune Ring Road)
या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व मार्गातील मावळ तालुक्यातून ११, खेड १२, हवेली १५, पुरंदरमधील पाच आणि भोरमधील तीन गावांतून प्रस्तावित आहे, तर पश्चिम मार्गावरील भोर तालुक्यातील एक, हवेली ११, मुळशी १५ आणि मावळ तालुक्यातून सहा गावे बाधीत होणार आहेत.
पश्चिम मार्गावरील ३४ गावांपैकी ३१ गावांमधील ६४४ हेक्टर जमिनीच्या संपादनाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी २९७५ कोटी रुपये मोबदला दिला आहे. भोर
तालुक्यातील पाच गावे वगळून शिवरे गावाचा समावेश झाल्याने या गावातील मूल्यांकनाचे दरनिश्चितीचे काम झाले आहे. पश्चिम मार्गाच्या भूसंपादनासाठी यापूर्वीच गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळाकडून (हुडको) दहा हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे. या माध्यमातून पश्चिम मार्गाचे बहुतांश भूसंपादन मार्गी लागले आहे.
पूर्व मार्गाच्या भूसंपादनासाठी रस्ते महामंडळाला निधीची गरज होती. त्यानुसार महामंडळाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात वर्तुळाकार रस्त्याच्या भुसंपादनासाठी तब्बल दहा हजार ५१९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून या प्रकल्पाच्या पूर्व मार्गातील खेड आणि हवेली तालुक्यातील जमिनींच्या संपादनाबाबत निवाडा जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, पश्चिम मार्गातील केवळ दोन – तीन गावांतील किरकोळ भूसंपादन बाकी आहे, तर पूर्व मार्गाचे भूसंपादन वेगाने करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील महिनाअखेरीस भूसंपादन पूर्ण करून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी निधीची कमतरता नसल्याने भूसंपादन वेगाने करण्यात येत आहे. आवश्यक जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर पावसाळा संपताच या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरू करता येणार आहे. पावसाळ्यापर्यंत भूसंपादन पूर्ण होऊन कामाला सुरुवात होईल, त्यादृष्टीने निविदा प्रक्रिया वगैरे अनुषंगिक कामे रस्ते महामंडळाकडून करण्यात येत आहेत.
– राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, रस्ते महामंडळ
वर्तुळाकार रस्त्यासाठी पश्चिम मार्गाचे बहुतांश भूसंपादन पूर्ण झाले आहे. पूर्व मार्गाचे भूसंपादन प्रगतिपथावर आहे. जुलैअखेरपर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे. सातत्याने या प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत बैठक घेऊन आढावा घेण्यात येत आहे.
– डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी