कांद्याच्या दराने गेल्या काही दिवसांत मोठीच उडी घेतली आहे. कांद्याच्या राष्ट्रीय सरासरी किरकोळ भावात तब्बल 57 टक्क्यांनी वाढ होऊन प्रतिकिलो भाव 47 रुपयांवर गेला आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्यान पन्नाशी गाठला आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल ॲग्रिकल्चरल को – ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड) आणि नॅशनल कन्झुमर को – ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया (एनसीसीएफ ) या दोन सहकारी संस्थांच्या माध्यमातून तातडीने भाव आटोक्यात आणण्याच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
त्याकरिता जेथे कांद्याची दरवाढ झालेली आहे अशा राज्यांत बफर स्टॉकमधील कांदा 25 रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वी याच कालावधीत कांद्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 30 रुपये प्रतिकिलोवरून शुक्रवारी 47 रुपये प्रतिकिलो झाली.
दिल्लीमध्ये किरकोळ किंमत 40 रुपये प्रतिकिलो झाली असून वर्षभरापूर्वी ती याच कालावधीत 30 रुपये प्रतिकिलो होती. ऑगस्टच्या मध्यापासून ‘बफर स्टॉक’मधून कांद्याचा पुरवठा करत आहोत आणि किमती वाढू नयेत आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आम्ही किरकोळ विक्री वाढवत आहोत, असे ग्राहक व्यवहार सचिव रोहितकुमार सिंग यांनी सांगितले.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या राज्यांमध्ये किमती झपाट्याने वाढत आहेत, तेथे घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये ‘बफर स्टॉक’मधून कांद्याचा पुरवठा केला जात आहे. ऑगस्टच्या मध्यापासून सुमारे 1.7 लाख टन कांद्याचा ‘बफर स्टॉक’मधून 22 राज्यांमध्ये विविध ठिकाणी पुरवठा करण्यात आला.
कांद्याचे भाव का वाढले ?
यंदा हवामानाशी संबंधित कारणामुळे खरीप कांद्याच्या पेरणीला उशीर झाल्यामुळे पीक कमी झाले. हे पीक बाजारात यायला उशीर झाला. सध्या खरीप कांद्याची आवक सुरू व्हायला हवी होती, मात्र, तसे झाले नाही. त्यातच साठवलेला रब्बी कांदा संपल्याने आणि खरीप कांद्याची आवक होण्यास उशीर झाल्यामुळे पुरवठ्याची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात भाव वाढत आहेत.
कांद्याने गाठली पन्नाशी..
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात एक नंबरच्या चांगल्या कांद्याला किलोमागे 55 रुपयांचा भाव मिळाला आहे. कांद्याचे उत्पादन पाहता दर आता वाढतच राहणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. नेहमी घाऊक बाजारात कांद्याच्या 100 ते 125 गाड्या येत असतात.
आता फक्त 50 ते 60 गाड्या येत आहेत, अशी माहिती व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली. घाऊक बाजारात गेल्या काही महिन्यांपासून उत्तम दर्जाचा नंबर एकचा कांदा केवळ 20 टक्केच येत आहे. त्यामुळे या कांद्याला 50 ते 55 रुपये दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात एक नंबरचा कांदा 60 रुपये किलो झाला आहे.
सरकारने केला दुप्पट बफर स्टॉक
केंद्र सरकारने चालू वर्ष 2023-24 मध्ये कांद्याचा बफर स्टॉक दुप्पट केला आहे. यामुळे देशांतर्गत उपलब्धता सुधारेल आणि आगामी काळात वाढत्या किमतींना आळा बसेल. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत पाच लाख टनांचा बफर स्टॉक ठेवला आहे. येत्या काही दिवसांत अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची योजना आहे.