भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जमीन किंवा स्थावर मालमत्तेच्या संदर्भातील दस्त, तसेच इतर जुन्या काळातील अभिलेखांचे संगणकीकरण करण्यात येत आहे त्यानुसार तहसील स्तरावर नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव, ठाणे जिल्ह्यांमधील तब्बल 3 कोटी 73 लाख 198 अभिलेखांचे संगणकीकरण करण्यात आले आहे, तर सातारा, गोंदिया, नंदुरबार, जालना, लातूर, अमरावती येथील भूमी अभिलेख स्तरावर 4 लाख 3 हजार 350 अभिलेख सांक्षांकित (डिजिटल साइन) असे एकूण 3 कोटी 77 लाख 3 हजार 548 कागदपत्रांच संगणकीकरण पूर्ण करण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने जुन्या 150 वर्षांपूर्वीच्या, तसेच ब्रिटिशकालीन नोंदींचे देखील संगणकीकरण करण्यात येत आहे. सन 2011 साली केंद्र शासनाने अधिकार अभिलेख जनतेला घरबसल्या (ऑनलाइन) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी डेटा युनिकोडमध्ये असणे आवश्यक होते म्हणून केंद्र शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम सुरू केला.
त्यानुसार जिल्हानिहाय विभागणी करून फेरफार, सातबारा, आठ अ – क – ड – ई पत्रक, हक्क नोंदणी पत्रक, इनाम पत्रक, जन्म मृत्यू, लेजर बूट, खासरा पत्रक, जोड तक्ता, कुळ नोंदणी, पेरेपत्रक, रेकॉर्ड हक्क पत्रक, गाव नकाशा, टिपण अशा जवळपास 23 कागदपत्रांचे तहसील स्तरावर संगणकीकरण करण्यात येत आहे.
हक्क नोंदणी वही, गुणाकार पुस्तक, आकारफोड, कजाप, दशमान, शेतपुस्तक, पुरवणी पत्रिका, ताबेपावती, शेतवार, पोट हिस्सा पत्रक – टिपण, निस्तार चौकशी, शहर सर्वेक्षण पुस्तिका या जवळपास 20 पेक्षा अधिक कागदपत्रांचा भूमा अभिलेख स्तरावर संगणकीकरण होत असून, इतर प्रॉपर्टी कार्ड, प्रॉपर्टी नोंद वही, शेत पुस्तिका, गाव धारिका, शहर सर्वेक्षण, वस्लेवर पुस्तक आणि चौकशी नोंद वही या 7 कागदपत्रांचे नागरी भूमापन विभागाच्या धर्तीवर जुन्या 150 पूर्वीच्या (ब्रिटिशकालीन) कागदपत्रांचे संगणकीकरण करण्यात येत आहे..
त्यानुसार तहसील स्तरावर सहा जिल्ह्यातील 3 कोटी 73 लाख 198 कागदपत्रांचे संगणकीरण करण्यात आले आहे, तर भूमी अभिलेख स्तरावर 4 लाख हजार 350 अभिलेख सांक्षांकित (डिजिटल साइन) संगणकीकरण पूर्ण करण्यात आले असून, उर्वरीत जिल्ह्यांतील संगणकीकरण प्रणाली अंतिम टप्यात आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाच्या प्रभारी अप्पर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक सरिता नरके यांनी दिली..
स्वाक्षरीचे काम प्रगतिपथावर नागरिकांच्या मागणीस्तव डिजिटल स्वाक्षरी असलेले अभिलेख ऑनलाइन https://digitalsatbara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये स्वाक्षरीचे काम प्रगतिपथावर आहे, असेही नरके यांनी सांगितले.