कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांना बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश प्रक्रियेंतर्गत राखीव जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यातून राज्यातील हजारो बालकांना फायदा मिळणार आहे.
बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार, खासगी शाळांमध्ये 25 टक्केच्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 मार्चपासून सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया 17 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
मुदतीनंतर कुठल्याही अर्जाची दखल घेतली जाणार नसल्याच्या सक्त सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. दुर्बल वंचित घटकातील बालकांना शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.
या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार कोरोना काळात म्हणजे 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत दोन्ही पालक अथवा आई किंवा वडील गमावलेल्या बालकांना यंदा या प्रवेश प्रक्रियेंतर्गत मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे :-
आरटीई प्रवेशासाठी जन्माचा दाखला
पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन
निवासी पुरावा
रेशनकार्ड
वाहन परवाना
घरपट्टी पावती
आधार कार्ड
मतदान ओळखपत्र
सामाजिक वंचित जात संवर्गातील बालक असल्यास वडिलांचा अथवा बालकांचा जातीचा दाखला
आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातून प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला
दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र
अशी आहे वयोमर्यादा..
बालकांचा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मुलांना पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत दिले जाते. त्यानुसार 31 डिसेंबर 2023 रोजीचे किमान वय 6 वर्ष किंवा कमाल वय 7 वर्षे 5 महिने 30 दिवस बालकांचे वय असणे अपेक्षित आहे.
एकही बालक वंचित राहू नये..
बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत अर्ज करताना पालकांनी पाल्यांचा परिपूर्ण अर्ज दिलेल्या मुदतीत सादर करावा.
अर्ज करताना अचूक व खरी माहिती द्यावी. आरटीई अंतर्गत 25 टक्के अंतर्गत एखाद्या शाळेत प्रवेश घेतल्यास त्या बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही. आर्थिक वर्षात 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटांमध्ये समावेश होतो. 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी 10 शाळांची निवड करावी.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी शिक्षण विभागाने 17 मार्चपर्यंत मुदत दिली असून त्यानंतर सोडत काढण्यात येईल. पालकांनी पाल्यांचा मुदतीत अर्ज भरणे बंधनकारक आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शीपणे राबवली जाईल. शिवाय कोरोनात पालक गमावलेला एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठीची विशेष काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. – दीपक केसरकर, शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- इथे क्लिक करा