Coastal Road : मुंबईच्या सौंदर्यात पडणार भर..! 70 टक्के काम पूर्ण, 11Km चा पहिला टप्पा ‘या’ दिवशी होणार खुला, पहा भारतातल्या अनोख्या रस्त्याची खासियत..
शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकर यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पश्चिम सागरीकिनारपट्टीवर साकार होत असलेला मुंबईतील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक कोस्टल रोड प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आलं आहे. या प्रकल्पाचे 70 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. कोस्टल रोडचा टप्पा 1 नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य मुंबई महापालिकने ठेवले असून नव्या वर्षात त्याचे लोकार्पण होणार आहे.
दरम्यान, अत्याधुनिक तंत्रज्ञानासह बांधण्यात येत असलेल्या या कोस्टल रोडमुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडणार आहे. अशा परिस्थितीत कोस्टल रोड प्रकल्प मुंबईकरांसाठी सर्वात महत्त्वाचा असून, तो सुरू झाल्यानंतर मुंबईकरांनाही वाहतुकीपासून दिलासा मिळणार आहे. यासोबतच प्रवासाचा वेळ 70 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
मुंबई महापालिकेच्या वतीने 12 हजार 721 कोटी रुपये खर्च करून कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे – वरळी सी लिंक वरळीच्या टोकापर्यंतच्या 10.58 किमी लांबीच्या या रस्त्यामुळे सुमारे 70 टक्के वेळेची बचत होईल.
इंधन, ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषणात घट होईल. या मार्गावरील सुरू असलेल्या बोगद्याचे 91 टक्के काम पूर्ण झाले असून 79 टक्के समुद्रभिंतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
या प्रकल्पासाठी एकूण 111 हेक्टर क्षेत्रावर भराव घालण्यात आला आहे. सध्या या कोस्टल रोडचे काम युद्धपातळीवर सुरू असून या मार्गावरील जवळजवळ 70 हेक्टर हरितक्षेत्र निमितीमुळे प्रण आणि बांधण्यात येणाऱ्या सागरी तटरक्षक भिंतीमुळे सागरीकिनाऱ्याची धूप होणार नाही. तसेच वादळी लाटांपासूनही संरक्षण होईल. कोस्टल रोडच्या मार्गावर मुंबईतील प्रसिद्ध हाजीअली, महालक्ष्मी मंदिर आणि वरळी येथे सार्वजनिक पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
12721 कोटींचा खर्च..
मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाची किंमत सुमारे 12,721 कोटी आहे, त्यापैकी 8429 कोटींचा खर्च हा रस्ता तयार करण्यासाठी वापरण्यात आले आहेत. या कोस्टल रोड फेज 1 ची लांबी 10.85 किलोमीटर आहे, जी मरीन ड्राइव्ह ते वांद्रे वरळी सी – लिंक पर्यंत आहे. हा रस्ता 4 लेनचा आहे आणि 4 लेन डाऊन आहे. त्याचबरोबर बोगद्याखालील हा मार्ग 3 लेनचा असेल, तसेच या मार्गावर 4 लेनपैकी 1 लेन बीआरटीएस आणि रुग्णवाहिकेसाठी ठेवण्यात आली आहे.
याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे 4 किमीचा ऍप्रोच रोड आणि 4 किमीचा बोगदा आहे ज्यामध्ये 2 किमी समुद्र आणि डोंगराच्या खाली आहे आणि 2 किमीचा रॅम्प बोगदा आहे जो गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क पर्यंत आहे.
काय आहे या प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये :-
मुंबईच्या या कोस्टल रोड प्रकल्पाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे या संपूर्ण 10.85 किलोमीटर लांबीच्या मार्गावर कार पार्किंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण रस्त्यावर 4 पार्किंग एरिया करण्यात आला आहे. जिथे 1800 वाहने उभी करता येणार आहे. त्याचबरोबर या महामार्गावर 3 इंटरचेंज रस्तेही करण्यात आले आहेत. लोकांच्या सोयीसाठी हे मार्ग हाजी अली, वरळी आणि इमर्सन गार्डनसाठी राहणार आहेत. यासोबतच या मार्गावर भविष्यासाठीही तयारी करण्यात आली आहे. येत्या काही वर्षांत हा रस्ता सुरू झाल्यानंतर गर्दी वाढल्यास या रस्त्यावर 11 मीटरचा पॅच ठेवण्यात आला असून, मध्यभागी गरज भासल्यास लेन वाढवता येणार आहे.
2024 पर्यंत सर्व रस्ता होणार खुला..
या कोस्टल रोडवर आणखी एका खास गोष्टीची काळजी घेण्यात आली आहे. जिथे पादचाऱ्यांना सहज रस्ता ओलांडता यावा यासाठी या 10 किलोमीटरच्या रस्त्यावर 16 अंडरपास बनवण्यात आले आहेत. त्याच बरोबर ठिकठिकाणी लोकांसाठी योगा पार्क, सायकलिंग ट्रॅक आणि बागाही बनवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर या महामार्गाचे काम वेगाने पूर्ण होत असून तो नोव्हेंबर 2023 पर्यंत तयार होणार असून 2024 पर्यंत तो लोकांसाठी खुला करण्यात येणार आहे.