शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! कापसाच्या दरांत वाढ, राज्यातील ‘या’ बाजार समितीत मिळाला हंगामातील उच्चांकी भाव..
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2021-2022 मध्ये कापसाला 10 ते 12 हजारांपर्यंत भाव मिळाला होता. यंदाही कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेने मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. मात्र, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या हजारो हेक्टरवरील कापसाच पीक उद्धवस्त झाले. उरल्या सुरल्या आशेवर बाजारभावान पाणी फेरले.
परंतु आता कापसाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून कापसाचे भाव वधारले आहेत. विदर्भातील कापसाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला उच्चांकी दर मिळाला आहे. तर देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीत 7 मार्च रोजी कापसाला प्रतिक्विटल 8 हजार 300 रुपये दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी भाव असल्याचे बोलल्या जात असुन शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे..
मात्र, मागील वर्षांच्या तुलनेत यंदाही कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली. त्यामुळे काही शेतकऱ्यानी विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे केंद्र सरकारनं कापसाची किमान आधारभूत किंमत 6 हजार 380 रुपय निश्चित केली. या एमएसपीवर शेतकऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे.
एवढ्या रकमेवर कापसाचा खर्चही व्यवस्थित निघत नाही. किमान कापसाला 10 ते 12 हजार रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, असा सूर शेतकऱ्यांमधून निघत आहेत.
दरम्यान, उशीरा का होईना, पण आता कापसाचे दर वाढले आहेत. कापसाला प्रतिक्विंटल 8 हजारापेक्षा अधिक भाव मिळत आहे.
कोणत्या बाजारात कापसाला काय आहे दर ?
10 मार्च रोजी अकोला (बोरगावमंजू) बाजारात केवळ 88 क्विंटल कापसाची आवक झाली. ज्याचा किमान भाव 7300 रुपये प्रतिक्विंटल होता. कमाल भाव 8000 रुपये प्रतिक्विंटल होता. सरासरी 7650 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला..
अकोट बाजार समितीत 3950 क्विंटल कापसाची आवक झाली. जिथे एच-4 मध्यम स्टेपल कापसाला किमान भाव 7500 रुपये प्रतिक्विंटल होता. कमाल भाव 8280 रुपये प्रतिक्विंटल होता. सरासरी 8200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
वरोरा बाजार समितीत 130 क्विंटल कापसाची आवक झाली. ज्याचा किमान भाव 6100 रुपये प्रतिक्विंटल होता. कमाल भाव 7800 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी 7400 रुपये प्रतिक्विंटल होता.
हिंगणघाट बाजार समितीत 6000 क्विंटल कापसाची आवक झाली. ज्याचा किमान भाव 6000 रुपये प्रतिक्विंटल होता. कमाल भाव 7915 रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी 6500 रुपये प्रतिक्विंटल होता..
सभापतींसह संचालक मंडळाकडून जनजागृती..
आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या परिसरातील बळीराजाला धीर देण्याचं काम देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून होत आहे. समिती आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनात बळीराजासाठी विविध उपक्रम राबवत असतानाच बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, सचिव किशोर मस्के व नवनिर्वाचित संचालक व कर्मचाऱ्यांकडून बाजार समितीतील शेतमालाचे भाव दररोज सोशल मीडियाच्या माध्यमातून गावा गावात पोहोचल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती होत आहे.